पुणे

जेजुरी गडावर चंपाषष्ठीला प्रारंभ; शंकराचार्य नृसिंह भारतींच्या हस्ते घटस्थापना

Laxman Dhenge

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या जेजुरीच्या श्रीखंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला जेजुरी गडावर बुधवार (दि. 13) पासून प्रारंभ झाला आहे. जेजुरी गडावर करवीरपीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते श्रीखंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्तींची घटस्थापना करण्यात आली. श्रीखंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ यात्रा भारतात. या यात्रेमध्ये चंपाषष्ठी उत्सवाला धार्मिक महत्त्व आहे. पौराणिक काळात भगवान श्रीशंकराने मार्तंडभैरव अवतार घेऊन मनी आणि मल्ल या असुरांशी युद्ध करून विजय मिळवला व खंडोबाचा अवतार घेतला.

या विजयाचे प्रतीक म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदेपासून 6 दिवस जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा होतो. बुधवारी सकाळी श्रीखंडोबा देवाला अभिषेक, पूजा करण्यात आली. गडावरील रंगमहालात करवीरपीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते श्रीखंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्तींची घटस्थापना करण्यात आली. या वेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे, विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे, अनिल सौंदडे, अ‍ॅड. पांडुरंग थोरवे, विश्वास पानसे, व्यवस्थापक राजेंद्र जगताप आदी होते. शशिकांत सेवेकरी गुरुजी यांनी पौराहित्य केले.

जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान जेजुरी, जेजुरी देवसंस्थान, भाविक, पुजारी, सेवकवर्ग व ग्रामस्थ यांच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 6 दिवस त्रिकाळ आरती, महापूजा, महाआरती, वाघ्या-मुरुळींचे जागरण गोंधळ, महाप्रसाद अशा विविध उपक्रमांचे जेजुरी गडावर आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त श्रीखंडोबा मंदिर व जेजुरी गडाला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. कुलदैवत श्रीखंडोबा असणार्‍या प्रत्येक कुटुंबात घरोघरी घटस्थापना होऊन चंपाषष्ठी उपासनेला सुरुवात झाली आहे.

या उत्सवाचे नियोजन जयमल्हार चंपाषष्ठी प्रतिष्ठानचे गणेश आगलावे, प्रशांत सातभाई, बाळासाहेब दीडभाई, बापू सातभाई, हरिभाऊ लांघी, सतीश कदम, अनिल आगलावे, महेश बारभाई, चेतन सातभाई, अविनाश बारभाई आदींनी केले. या उत्सव काळात हजारो भाविकांना जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी भाविकांनी सहकार्य केल्याचे गणेश आगलावे, प्रशांत सातभाई, बाळकृष्ण दीडभाई यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT