पुणे

कात्रज येथील उड्डाणपूल मुदतीत पूर्ण करण्याचे आव्हान

अमृता चौगुले

कात्रज(पुणे) : कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वंडरसिटी ते माउलीनगर दरम्यान उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या कामाची अंतिम मुदत 24 फेब्रुवारी 2024 पर्यंत असल्याने आगामी सहा महिन्यांत हा पूल पूर्ण होणे आवश्यक आहे. या दृष्टीने हे काम गतीने सुरू असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षातील चित्र पाहता हे काम मुदतीत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वंडरसिटी ते माउलीनगर दरम्यान या कात्रजच्या उड्डाणपुलाचे 24 सप्टेंबर 2021 रोजी उद्घाटन झाले. गेल्या दोन वर्षांपासून हे काम सुरू आहे. कात्रज-देहूरुड बाह्यवळण महामार्गावरील नवले पुलाकडून कोंढव्याकडे जाणारी जड व इतर वाहतूक कात्रज चौकात न येता ती वंडरसिटी येथून उड्डाणपुलावरून राजस सोसायटीच्या पुढे माउलीनगरजवळ उतरणार आहे. यामुळे कात्रज चौक व राजस चौकातील वाहतुकीची समस्या मार्गी लागणार आहे.

हा उड्डाणपूल राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या जागेतून जात असून या कामासाठी केंद्र सरकारकडून 169.15 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. हा पूल सहापदरी असून त्याची लांबी 1 हजार 326 मीटर आहे. वाहतूक कोंडी व अपघातांच्या मालितेतून सुटका होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

कामाची सद्य:स्थिती

सुरुवात : 25 फेब—ुवारी 2022
अंतिम मुदत : 24 फेब—ुवारी 2024
पिलरसंख्या : 20 (सर्वांचे काम पूर्ण)
पिलर कॅप : 20 पैकी सहाचे काम पूर्ण
गर्डर : 321 पैकी 55 चे काम पूर्ण
सेवा रस्ते : 90 टक्के काम पूर्ण

उड्डाणपुलाचे काम गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आता सर्व पिलरचे काम पूर्ण झाले असून कात्रज भिलारेवाडी येथे गर्डरचे काम सुरू आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम वेळेत पूर्ण होईल.

– धनंजय देशपांडे,
कार्यकारी अभियंता,
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

हेही वाचा

SCROLL FOR NEXT