राजगुरुनगर : केंद्र शासन जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करून उद्योगव्यवसायाला चालना देत असताना चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये शासनाने सर्वप्रकारच्या करामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. सध्या विविध कारणांमुळे उद्योगधंदे आधीच अडचणीत असताना चाकण औद्यागिक वसाहतीत (एमआयडीसी) सर्वप्रकारच्या करांमध्ये वाढ झाल्याने उद्योजकांच्या अडचणीत अधिकच भर पडली असून, या अन्यायाविरुद्ध फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आवाज उठविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष दिलीप बटवाल यांनी सांगितले. (Latest Pune News)
आशिया खंडातील सर्वांत मोठी औद्यागिक वसाहत (एमआयडीसी) म्हणून चाकणकडे पाहिले जाते असून, अंदाजे 750 हून अधिक उद्योग आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह, उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि रसायन यांसारख्या विविध उद्योगांमधील मोठ्या आणि लहान कंपन्यांचा समावेश आहे. चाकण एमआयडीसीत चार-पाच टप्प्यांत तब्बल 5 हजार हेक्टर क्षेत्र संपादित करून, येथे सध्या फोक्सवॅगन, बजाज ऑटो, मर्सिडीस-बेंझ आणि ह्युंदाई यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
याशिवाय हजारो स्थानिक व अन्य लहान-मोठे उद्योग या एमआयडीसीवर अवलंबून आहेत. परंतु, आजही चाकण एमआयडीसीत अपेक्षित त्या पायाभूत सुविधा नीट पुरविल्या जात नाहीत. रस्त्यांची, वाहतूक कोंडीची समस्या तर जीवघेणी झाली असून, कचरा व पाण्याची समस्या देखील गंभीर आहे. अशा परिस्थितीत शासनाने चाकण एमआयडीसीत सेवाकर, पाणीपट्टी, रस्ताकर यांसारख्या सर्वच करांमध्ये मोठी वाढ केली आहे. यामुळेच येथील उद्योजकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून चाकण एमआयडीसीत कोणतीही टॅक्सवाढ केली नव्हती. परंतु, आता सर्व गोष्टींचा खर्च प्रचंड वाढल्याने ही टॅक्सवाढ लागू करण्यात आली आहे. यामध्ये काही टॅक्स दुप्पट, तर काही केवळ 10-15 टक्क्यांनी वाढविण्यात आले आहेत.प्रकाश भडांगे, अभियंता चाकण एमआयडीसी
एमआयडीसीने वाढविलेले कर अवास्तव असून, हे उद्योगांवर अन्याय करणारे आहे. एमआयडीसीने उद्योगांना विचारात न घेता तीन ते चारपटीने अचानक कर वाढविला आहे. याचा विपरीत परिणाम उद्योगांवर होणार आहे. एमआयडीसीकडून होत असलेल्या या अन्यायाविरुद्ध चाकण एमआयडीसीत वाढीव कराविरोधात आवाज उठवणार असून, हा कर कमी करण्यासाठी आग्रही भूमिका घेणार आहे.दिलीप बटवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज