पुणे: ढोल-ताशाचा गजर अन् बँड पथकांच्या निनादात जल्लोष करीत विजेत्या मंडळांनी विजयी चषक उंचावत आपला आनंद साजरा केला. उत्साहपूर्ण वातावरणातील या जल्लोषाने सहकारनगरमधील स्व. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचे विजय तेंडुलकर नाट्यगृह शनिवारी (दि.20) सायंकाळी दणाणून सोडले. संगीत, नृत्यांची मेजवाणी असलेल्या या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला गणेशोत्सव मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. (Latest Pune News)
अनेक मंडळे आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीनेच ढोल-ताशा व बँड पथके घेऊन कार्यक्रमाला हजर होती. जसजशी पारितोषिके जाहीर होऊ लागली तसतशी या वाद्यपथकांनी जोरदार वादन करीत अख्खे नाट्यगृहच डोक्यावर घेतले.
या वाद्यांच्या निनादात आणि बाप्पाचा जयघोष करीत चषक उंचावून नाचणाऱ्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनाला भिडला होता. उपिस्थित श्रोते व अन्य मंडळांचे कार्यकर्तेही प्रत्येक विजेत्याला मनापासून दाद देत होते.
पारितोषिक वितरण समारंभापूर्वी आयोजित जतीन पांडे यांच्या संगीत व नृत्याच्या कार्यक्रमालाही उपस्थितांकडून मोठी दाद मिळाली. नटरंग ॲकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेले नृत्याविष्कार तसेच लावणी नृत्यालाही प्रेक्षकांची टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली.