चाकण: खेड तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण केली आहे. संपूर्ण तालुक्यात ढगफुटीसारखा पाउस सुरु आहे. सोमवारी ( दि. ६ जुलै) सकाळी पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी प्रचंड पाणी आल्याने महामार्ग ठप्प झाला आहे.
प्रमुख औद्योगिक व व्यापारी केंद्र असलेल्या चाकण शहरात आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या संततधार पावसामुळे चाकणमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे नाले आणि ओढे अनियंत्रित झाले असून अने ठिकाणी दुकाने, घरे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
या पावसाचा सर्वाधिक फटका वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. पुणे-नाशिक महामार्गासह चिंबळी फाटा, स्पायसर चौक, आळंदी फाटा आणि चाकण मधील तळेगाव चौक , आंबेठाण चौक, वाकी सुम्ब्रे नगर भागात कंबरेपर्यंत महामार्ग पाण्याखाली गेले आहेत.
त्यामुळे या प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चाकण एमआयडीसी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने आणि पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने चाकरमानी व कामगारांना कामावर पोहोचण्यासाठी तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला आहे. मुसळधार पाउस सुरूच असून पाण्याचा निचरा होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. चाकण शहराची तुंबई झाल्याचे स्थानीक नागरिकांनी सांगितले आहे.