चाकण: अंडा-भुर्जीची गाडी चालवणार्या व्यावसायिकाने हप्ता देण्यास उशीर केल्याने सहा जणांनी गाडीवर काम करणार्या दोघांचे अपहरण करून कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील जंगलात नेऊन त्यांच्यावर खुनी हल्ला केला.
राहुल चव्हाण (वय 21, रा. खेड) आणि तुषार सुपे अशी जखमींची नावे आहेत. राहुल यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नारायण घावटे (वय 25), ऋषिकेश रोकडे (वय 27), रोशन गोगावले (वय 22), अनिल शिंदे (वय 24) आणि गणेश लिंबोरे (वय 24) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नारायण, ऋषिकेश आणि रोशन यांना अटक केली आहे. (Latest Pune News)
फिर्यादी राहुल हे विशाल देशमुख यांच्या अंडा-भुर्जीच्या गाडीवर काम करतात. आरोपींनी विशाल देशमुख यांच्याकडे अंडा-भुर्जीचा व्यवसाय करण्यासाठी दर महिन्याला 10 हजार रुपये खंडणीची मागणी केली.
मागील काही महिन्यांपासून आरोपीला विशाल देशमुख खंडणी देत होते; मात्र मागील महिन्यात खंडणी देण्यासाठी उशीर झाला, या कारणावरून आरोपींनी अंडा-भुर्जीच्या गाडीवर काम करणारे राहुल चव्हाण आणि तुषार सुपे यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्यांचे अपहरण केले. खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द येथील जंगलात नेऊन त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. महाळुंगे एमआयडीसी पोलिस याप्रकरणी तपास करीत आहेत.