पुणे

ज्वेलर्सवर दरोडा टाकणार्‍या टोळीला बेड्या; चोवीस तासांत गुन्हे शाखा पथकाने लावला छडा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तपास भरकटविण्यासाठी काही ठरावीक अंतरावर जाऊन वेशांतर करणार्‍या सात जणांच्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नगरमधील भिंगार, रायगड आणि चाकण येथून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 601 ग्रॅम वजनाचे सोने, 2 दुचाकी, एक चारचाकी, 6 मोबाईल असा 48 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सनी ऊर्फ योगेश हिरामण पवळे (वय 20, पौड रोड, कोथरूड), सनी ऊर्फ आदित्य राजू गाडे (वय 19 रा. कोथरूड), पीयूष कल्पेश केदारी (वय 18 रा, येरवडा), ओमकार ऊर्फ ओम्या जगन वाल्हेकर (वय 19, रा. कोथरूड), नारायण ऊर्फ नारू बाळू गवळी (वय 20, रा. टिळेकरनगर, कात्रज), मयूर चुन्नीलाल पटेल (वय 53, रा. वानवडी), नासिर मेहमूद शेख, (वय 32, रा. वानवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नवे आहेत. याबाबत शफीउद्दीन शेख (वय 23, रा. नाना पेठ) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शनिवारी (दि.18) महंमदवाडी रस्त्यावरील वाडकरमळा परिसरातील मॅजेस्टिक मेमरीज सोसायटीच्या तळमजल्यावरील बी. जी. एस. ज्वेलर्स येथे ही घटना घडली होती. फिर्यादी शेख हे दुकानात बसले असताना सोने खरेदीच्या बहाण्याने आरोपी चेहर्‍याला मास्क लावून दुकानात आले. त्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून फिर्यादीना मारहाण करून 600 ग्रॅम वजनाचे तयार दागिने घेऊन आरोपी पसार झाले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर तत्काळ गुन्हे शाखेने खंडणीविरोधी पथक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक, युनिट चार, पाच आणि सहा अशी वेगवेगळी दहा पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक तपासावरून पोलिस कर्मचारी अशोक शेलार यांना महत्त्वाची माहिती मिळाली.

त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पुण्यासह नगरमधील भिंगार, रायगडसह चाकण येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, खंडणी विरोधी पथक 2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, पोलिस निरीक्षक उल्हास कदम, पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवदास लहाणे, वियजकुमार शिंदे, उपनिरीक्षक, श्रीकांत चव्हाण, यशवंत ओंबासे, अंमलदार मयूर भोकरे, चेतन शिरोळकर, सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे यांच्या पथकाने केली.

पंधरा दिवसांपासून सुरू होती रेकी

मयूर पटेल, सनी पवळे, सनी गाडे यांची येरवडा कारागृहात असताना ओळख झाली होती. तेथेच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर कट शिजविण्यापर्यंत झाले. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांची रेकी सुरू होती. त्यांनी रेकी केल्यानंतर दुपारच्या वेळी गर्दी नसलेल्या ज्वेलर्सच्या दुकानाला लक्ष्य केले. त्यांनी तेथे खरेदीच्या बहाण्याने जाऊन सराफी पेढीतील दागिने चोरी करून पोबारा केला. मात्र त्यांनी केलेला हा प्लॅन जास्त वेळ टिकू शकला नाही. पोलिसांनी लागलीच आपली दहा पथके कामाला लावून आरोपींना बेड्या ठोकल्या.

पोलिसांना चकवा देण्यासाठी वेशांतर

गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून वेगवेगळ्या दिशेला पळाले होते. मध्येच त्यांनी पोलिसांचा तपास भरकटविण्यासाठी वेशांतर केले. त्यानंतर पुन्हा सर्व जण पौड येथे एका ठिकाणी भेटले. त्यानंतर पोलिसांनी सर्वांचा माग काढत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

यापूर्वी दोनदा दरोड्याचा प्रयत्न गुन्ह्यातील आरोपी मयूर पटेल, नासीर शेख हे वानवडी भागात राहायला आहेत. यातील पटेल हा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून तोच सूत्रधार आहे. त्याने साथीदारासह यापूर्वी देखील दोन वेळा या ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यानंतर शनिवारी अखेर त्यांनी एकत्र येत दरोड्याचा प्लॅन केला. दरोड्याची घटना घडल्यानंतर काही तासांत आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील तीन आरोपी रेकॉर्डवरील आहेत. आरोपींकडून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

– अमोल झेंडे, उपायुक्त, गुन्हे शाखा.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT