पुणे

केंद्राने कृषि धोरणात बदल करण्याची गरज : शरद पवार

Laxman Dhenge

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने इथेनॉलच्या धोरणामध्ये सातत्य राखले पाहिजे,त्यातील फेर बदलामुळे शेतकरी अडचणीत येतात. ब्राझिल मध्ये गरजेनुसार ऊसापासून साखर किंवा इथेनॉलची निर्मिती केली जाते. विमानाचे इंधन सुध्दा ऊसापासून बनविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. या बाबींचा केंद्र सरकारने विचार करणे गरजेचे आहे. केंद्राने निर्यात धोरणात बदल करण्याची गरज असून याबाबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी चर्चा झाली असल्याचे जेष्ठ नेते,माजी केंद्रीय कृषी मंत्री,खासदार शरद पवार यांनी सांगितले.

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते झाला, याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खा.अमोल कोल्हे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, सुमित्राताई शेरकर, 'विघ्नहर'चे चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, जगन्नाथ शेवाळे, बाळासाहेब दांगट, शरद सोनवणे,विशाल तांबे, जुन्नर बाजार समितीचे सभापाती संजय काळे, जिल्हा परिषद माजी सदस्या आशाताई बुचके, बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, विघ्नहर कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक, राष्ट्रवादीचे नेते देवदत्त निकम, किशोर दांगट, अनिल मेहेर, अनंतराव चौगुले, दिलीप बाम्हणे, शरद लेंडे, पांडुरंग पवार, गुलाब पारखे, देवराम लांडे, मोहित ढमाले, अंकुश आमले, आदिंसह शेतकरी, कारखान्याचे सभासद ऊस उत्पादक गावोगावचे सरपंच-उपसरपंच, पंचायत समिती -जिल्हा परिषद सदस्य विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी तसेच विघ्नहर कारखान्याचे अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विघ्नहर साखर कारखान्याने साखरेबरोबरच, वीज निर्मिती व इथेनॉल प्रकल्पांची उभारणी केली होती. सध्या इथेनॉल प्रकल्पासाठी असलेल्या केंद्र शासनाच्या धोरणाच्या अनुषंगाने इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण केले आहे. त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे होणार आहे. असेही पवार यांनी सांगितले.पवार पुढे म्हणाले की, माझे कृषीमंत्री कार्यकाळात कांदा महागला म्हणून अनेक नेत्यांनी कांद्याच्या माळा गळयात घालून आंदोलने केली. शेतक-यांचा फायदा लक्षात घेवून आम्ही निर्यात थांबविली नाही.

सध्याच्या सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लादल्यामुळे कांदा बाजरभावात मंदी आल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.सत्यशिल शेरकर व त्यांच्या संचालक मंडळाने 'विघ्नहर'ची वाटचाल योग्य दिशेने सुरु ठेवली आहे. विघ्नहर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या ऊसाला रु.३०५० रूपये प्रतिटन बाजारभाव दिला असून या नवीन प्रकल्पामुळे पुढील काळात त्यात अधिकची भर टाकता येईल.

याप्रसंगी बोलताना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्र सरकारने साखरेची केलेली निर्यात बंदी व इथेनॉल वरील निबंध यामुळे साखर धंदा अडचणीत आला आहे. अडचणीच्या काळातही 'विघ्नहर'ची वाटचाल चांगली आहे. याबद्दल चेअरमन सत्यशिल शेरकर व संचालक मंडळाचे त्यांनी कौतुक केले. राज्यामधील विघ्नहर कारखाना एकमेव असा असावा की इथं सर्व पक्षीय नेते सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येतात आणि सत्यशिल शेरकर यांच्या कामाचे कौतुक करतात.

खा. अमोल कोल्हे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यात शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज होती. दुध, सोयाबिन, कांदा पिकांचे पडलेले बाजारभाव आणि वाढती महागाई याबाबत ते काही न बोलल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची निराशा झाली.
आमदार अतुल बेनके म्हणाले की, जुन्नर तालुक्याला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाची मोठी गरज आहे,त्यांनी विघ्नहर चे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या कारभाराचे कौतुक केले.

प्रास्ताविकात चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, यंदाच्या हंगामात विघ्नहर कारखान्याने आजपर्यंत ४ लाख २२ हजार ४६० मे.टन ऊसाचे गाळप केले असून ४ लाख २९ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.४६टक्के इतका आहे.या गाळप हंगामात अजून ५ लाख ५० हजार मे.टन ऊस उपलब्ध होईल व एकूण ९ लाख ५० हजार मे. टनाचे गाळप होईल, त्याचबरोबर साखरेवरील निर्यात बंदी उठवावी. साखरेला किमान विक्री दर हा ३६००रूपयांच्या पुढे असावा. त्याचबरोबर केंद्र सरकारने २०टक्के ज्यूट बॅग सक्तीने वापरण्याचे धोरण शिथील करावे, अशा मागण्या शेरकर यांनी यावेळी मांडल्या.

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी केले. सुत्रसंचालन सेक्रेटरी अरुण थोरवे व सुहास शेटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी मानले.

बैलगाडा मालकांचा सत्कार

चेअरमन सत्यशिल शेरकर यांचा १२ जानेवारी हा वाढदिवस त्यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने धामणखेल (ता. जुन्नर) याठिकाणी भव्य अशा बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतींमध्ये सुमारे ५५० बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या ६ बैलगाडा मालकांचा शरद पवार यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT