Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Pune Census 2027: जनगणना 2027: पुण्यात घरभेटींचे काम संथ; 11 हजार प्रगणकांवर प्रशासनाचा कडक इशारा

घरयादी तयार करण्यात ढिलाई; 1,600 पर्यवेक्षकांची तातडीची बैठक, कामचुकारांवर फौजदारी कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‌‘जनगणना 2027‌’ च्या पहिल्या टप्प्यातील घरयादी तयार करण्याचे काम पुण्यात संथ गतीने सुरू असल्याबद्दल प्रशासनाने कमालीची कडक भूमिका घेतली आहे. प्रत्यक्ष घरभेटींद्वारे माहिती संकलनाचे काम अपेक्षित गतीने होत नसल्याचे समोर आल्यानंतर, महापालिका प्रशासनाने शनिवारी सकाळी गणेश कला क्रीडा केंद्र येथे तब्बल 1,600 पर्यवेक्षकांची तातडीची आढावा बैठक घेऊन कामचुकारांना तीव इशारा दिला आहे.

या बैठकीत शहरात कार्यरत असलेल्या सुमारे 11,000 प्रगणकांकडून सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये अनेक भागांत प्रत्यक्ष घरभेटी आणि माहिती संकलनाची प्रगती असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर, प्रगणकांना क्षेत्रीय स्तरावर काम करताना येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणी, जनगणनेच्या मोबाईल ॲपचा वापर आणि कामकाजाची प्रत्यक्ष प्रक्रिया यावर चर्चा करण्यात आली, तसेच त्याची सविस्तर चर्चा करण्यात आली.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि जनगणना संचालनालयाचे सहसंचालक राजेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या वेळी सर्व चार्ज ऑफिसर्स आणि पर्यवेक्षकांना आपापल्या कार्यक्षेत्रातील प्रगणकांवर दररोज काटेकोर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दररोजच्या कामाचा अहवाल सादर करून घरभेटीचे नियोजनबद्ध काम निश्चित कालमर्यादेत आणि अत्यंत अचूकतेने पूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

काम न केल्यास थेट तुरुंगवास!

बैठकीमध्ये विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या आणि कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत प्रशासनाने तीव संताप व्यक्त केला. ‌‘जनगणना कीट‌’ ताब्यात घेऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न करणारे, तसेच प्रशिक्षणाकडे पाठ फिरवणाऱ्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांवर कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. संबंधितांनी तत्काळ कामावर रुजू न झाल्यास त्यांच्यावर ‌‘जनगणना कायदा 1948‌’ मधील तरतुदींनुसार कडक शिस्तभंग आणि थेट फौजदारी कारवाई केली जाईल, असा सज्जड दम प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांना महापालिका प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन

जनगणनेचे हे काम देशहिताचे व राष्ट्रीय महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना कोणतीही भीती न बाळगता संपूर्ण आणि अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय उपक्रमात आपले योगदान द्यावे, असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी नागरिकांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT