राज्यातील सीसीएमपी डॉक्टरांचा प्रश्न आठ दिवसांमध्ये सोडवू; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही Pudhari
पुणे

CCMP Doctors: राज्यातील सीसीएमपी डॉक्टरांचा प्रश्न आठ दिवसांमध्ये सोडवू; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

डॉ. बाहुबली शहा यांच्या उपोषणाची दखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील सीसीएमपी (सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मोकोलॉजी) उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेतील नोंदणीचा प्रश्न येत्या आठ दिवसांत कायमस्वरूपी सोडवू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यानंतर महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते उसाचा रस घेऊन मागे घेतले. हा प्रश्न कायमस्वरूपी न सुटल्यास पुन्हा बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा राज्यातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे. (Latest Pune News)

इंडियन मेडिकल असोसिएशनने खोट्या व अर्धसत्य माहितीच्या आधारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित खात्याच्या मंत्र्यांची दिशाभूल केल्याने सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणीसाठी चाप बसला. त्यामुळे संतप्त होमिओपॅथिक डॉक्टरांनी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक व मार्गदर्शक डॉ. बाहुबली शहा यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर बुधवार (दि. 16) पासून आंदोलन सुरू केले होते.

या आंदोलनात राज्यातून 20 हजारहून जास्त डॉक्टर सहभागी झाले तर इतर डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवून आंदोलनास उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता. या वेळी डॉ. बाहुबली शहा यांनी श्वासात श्वास असेपर्यंत होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगताच उपस्थित डॉक्टरांनी बाहुबली बाहुबली असा जयघोष केला.

या वेळी आमदार डॉ. संजय कुटे, डॉ. हिम्मत उढान, आ. सुरेश धस, आ. रवि राणा आ. नारायण कुचे, आ. देवेंद्र भोयर, आ. चैनसुख संचेती यांच्यासह 30 हून जास्त आमदारांनी आंदोलनस्थळी येत आंदोलनास जाहीर पाठिंबा दिल्याने जोरदार वातावरण निर्मिती झाली.

राज्यातील सर्व भागातून हजारो डॉक्टर्स येत असल्याचे पाहून गुरुवारी (दि. 17) संध्याकाळी मंत्रालयातून चर्चेसाठी येण्याचा निरोप आल्यानंतर डॉ. बाहुबली शहा, डॉ. रजनीताई इंदुलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झाले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची सविस्तर चर्चा झाली. या वेळी आठ दिवसांमध्य निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडवणीस यांनी दिले.

या वेळी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणारे आमदार सदाभाऊ खोत व रोहित पवार, डॉ. दीपक जगताप, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. राजेंद्र पाटुकले, डॉ. संदेश शहा आदींनी भाषणातून होमिओपॅथिक डॉक्टरांना राजाश्रय मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले.

विधिमंडळात आमदार गोपीचंद पडळकर यांनीदेखील होमिओपॅथिक डॉक्टरांचा प्रश्न उपस्थित केल्यावर सर्वांनी जल्लोष केला. व्यासपीठ व्यवस्थापन डॉ. शिवदास भोसले, डॉ. नितीन गावडे, डॉ. अवचार, डॉ. मिनाक्षी सेठ, डॉ. सुनील मुळीक व सहकार्‍यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT