सुनील माळी/गणेश खळदकर
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसईच्या शाळांच्या) अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाचा समावेश करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली असली, तरी सध्याच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांविषयी एक धडा आणि केवळ 68 शब्द देण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव दै. ‘पुढारी’च्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
सीबीएसईच्या देशपातळीवर शिकवल्या जाणार्या इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतच्या इतिहासाची पुस्तके दै. ‘पुढारी’ने तपासली. त्या इतिहासाच्या पुस्तकांची एकूण पाने आहेत 2 हजार 200. या सव्वादोन हजार पानांपैकी मराठ्यांचा इतिहास केवळ दोन पानांमध्ये अक्षरशः गुंडाळून टाकला आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांचे वर्णन केवळ अकरा ओळींत करण्यात आले असून, महाराजांबाबत केवळ 68 शब्द आहेत. म्हणजेच, माध्यमिक शाळांमधील मुलांना शिवाजी महाराजांची माहिती केवळ 68 शब्दांमध्ये मिळते आणि तीही कोरडी. त्यामुळे या माध्यमातून शिक्षण घेणारी मुले शिवछत्रपतींच्या चरित्रापासून होणार्या भावनिक, बौद्धिक पोषणापासून दूरच राहतात. याचा दूरगामी, भयंकर परिणाम होण्याची चिन्हे असून, पुढच्या पिढीतील मोठा भाग इथल्या मातीपासून, महान वारशापासून तुटत चालला आहे.
राज्य मंडळांच्या शाळांमधील इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या मराठी आणि इंग्लिश माध्यमाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास आहे; तर सातवीच्या पुस्तकात 18 व्या शतकातील मराठ्यांच्या साम्राज्याचा आणि समाजसुधारकांचा इतिहास आहे. चौथीच्या पुस्तकाचे मुखपृष्ठच घोड्यावरून दौडणार्या शिवाजी महाराजांच्या देखण्या चित्राचे आहे, तर त्यांच्या जीवनपटातील बहुतेक सर्व रोमहर्षक, तसेच नैतिकमूल्ये सांगणारे प्रसंग संपूर्ण पुस्तकातून मांडण्यात आले आहेत.
केंद्रीय सेवांमधील कर्मचार्यांच्या मुलांचे शिक्षण शक्यतो याच सीबीएसईच्या शाळांमधून होते. या कर्मचार्यांच्या बदल्या देशभर होत असल्याने त्यांना एकच एक केंद्रीय अभ्यासक्रम लागू करणे भाग पडते. त्यामुळे एका राज्यातील राज्यकर्त्यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करता येत नाही. तरीही सर्वच प्रमुख महापुरुषांच्या चरित्राची माहिती थोडक्यात दिली जाते. त्यामुळे शिवाजी महाराजांचा थोडक्यात उल्लेख करण्यात आला असावा, असे सांगण्यात आले. असे असले तरी प्रत्येक राज्यासाठी इतिहासाचे स्वतंत्र पुस्तक असावे; म्हणजे हा प्रश्न संपेल, असे काही तज्ज्ञ सांगतात. राज्य मंडळाच्या शाळांमध्ये आता सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यंदा पहिलीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांची पूर्ण माहिती आहे. हा अभ्यासक्रम सीबीएसई पॅटर्ननुसार करायचा झाला तरी त्या केंद्रीय शाळांच्या इतिहासाच्या पुस्तकांप्रमाणे केवळ साठ-सत्तर शब्द चालणार नाहीत, असे मतही व्यक्त करण्यात येते.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या पहिली ते बारावीच्या पुस्तकांचा आढावा घेतल्यानंतर काही धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी चाचपणी केली असता केवळ सातवीच्या पुस्तकात ‘द मराठा’ नावाचा एक धडा आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा राज्य स्थापन केले असून, ते मुघल सत्तेच्या विरोधातील एक प्रबळ विरोधक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 1630 ते 1680 या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार केला. ते मराठा साम्राज्याचे मुख्य आधारस्तंभ होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचा कारभार पेशव्यांच्या हातात गेला. पुणे ही मराठा साम्राज्याची राजधानी होती. त्यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चौथाई आणि सरदेशमुखीसंदर्भातील उल्लेख आहे. परंतु, राज्य मंडळातील पुस्तकांप्रमाणे स्वराज्याचा संपूर्ण इतिहास कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकात आढळला नाही.
सीबीएसई आणि सीआयएससीई या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना महापुरुष, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी माहिती व्हावी, अशा प्रकारचे धडेच इतिहासाच्या पुस्तकांमध्ये उपलब्ध नाहीत. इतिहास हा विषय समाजशास्त्र या विषयांतर्गत आता आहे. त्यामुळे केवळ इतिहासाच्या अभ्यासक्रमाला मर्यादा आल्या आहेत. त्याचबरोबर उपलब्ध अभ्यासक्रमांमध्येदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांनी केलेल्या कार्याची फारशी माहिती दिली जात नाही. तुलनेने अन्य देश, तसेच जगातील इतिहासाविषयी शिकवले जाते.
त्यामुळे महाराष्ट्रात राहूनदेखील विद्यार्थी छत्रपती शिवरायांसह मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील जमिनीवरील आणि सागरी गडकिल्ले याविषयीदेखील संबंधित विद्यार्थ्यांना माहिती नसल्याचे दिसून येते. संबंधित शाळांमध्ये ठराविक महापुरुष सोडले, तर अन्य महापुरुषांच्या जयंती, तसेच पुण्यतिथीदेखील साजरी करण्यात येत नाही. त्यामुळे देशातील संस्कृतीपासूनदेखील ही मुले दुरावलेली पाहायला मिळतात. राज्यात या वर्षापासून सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. यंदा पहिलीपासून ते पुढे टप्प्याटप्प्याने बारावीपर्यंत हा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. त्यामध्ये 30 टक्के इतिहास हा राज्यातील येणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, सीबीएसईचा सध्याचा अभ्यासक्रम पाहता येणार्या काळात तयार होणारी जी पिढी आहे, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तसेच मराठा साम्राज्याचा इतिहास काय होता, हे सांगणे कठीण होणार असल्याचे भीषण चित्र दिसून येत आहे.
राज्य मंडळाच्या शाळांमध्ये इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास आहे, तर सातवीच्या पुस्तकात 18 व्या शतकातील मराठ्यांच्या साम्राज्याचा आणि समाजसुधारकांचा इतिहास आहे. सीबीएसईच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सविस्तर इतिहास असावा, यासाठी आम्ही आंदोलने केली. चर्चासत्रे घेतली. आता राज्य शासनाने बालभारतीच्या चौथी आणि सातवीचा इतिहासच सीबीएसईच्या अभ्यासक्रमात स्वीकारणे गरजेचे आहे.पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक
सीबीएसई शाळांमधील चौथी ते बारावीपर्यंतच्या इतिहासाच्या सव्वादोन हजार पानांपैकी शिवाजी महाराजांबाबतचे हेच ते केवळ 68 शब्द : द मराठाज् - मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली (1630.) (हे जन्मवर्ष असल्याचा कुठेही उल्लेख नाही.) मुघल सत्तेला विरोध करणारी मराठा राजवट ही आणखी एक शक्तिमान प्रादेशिक राजवट ठरली. शक्तिशाली लढवय्या देशमुखांच्या, तसेच मराठा सेनेचा कणाच मानल्या गेलेल्या चपळ कुणब्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी (1630-1680) स्थिर राजवट दिली. या शक्तीच्या जोरावर शिवाजींनी मुघलांना आव्हान दिले.