Pune: कुरकुंभ-दौंड रस्त्यावर भागवतवस्ती परिसरात एका कारचा (चारचाकी) भीषण अपघात झाला. अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून दोनजण किरकोळ जखमी झाले आहे. सोमवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील जखमी अहमदनगर जिल्ह्यातील असून त्यांचे नावे समजू शकले नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेले कुटुंब बारामतीतील एका नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेले होते. तो कार्यक्रम उरकून ते पुन्हा कारने अहमदनगर येथील त्यांच्या घरी निघाले होते. यादरम्यान बेळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कुरकुंभ-दौंड रस्त्यालगत भागवतवस्ती कॅनलजवळील परिसरात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.
अपघात कशामुळे झाला हे समजू शकले नाही. रस्त्यालगत सुरक्षितेसाठी लावलेल्या लोखंडी कट्ट्यांना कार जोरात धडकली. यात कारच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यालगतचा लोखंडी पत्रा कारच्या इंजिनमध्ये घुसून बोनटमधून बाहेर निघाला आहे. अपघातादरम्यान कारमधील इअर बॅग उघडल्याने जीवितहानी टळली.
कारचालकाला पायाला जबर मार लागला आहे. कारमधील एक पुरूष व महिला यांना किरकोळ दुखापत झाली असून एका लहान बाळाला कुठलीही दुखापत झाली नाही. जखमींना दौंड येथील खासखी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.