पुणे

ढुम्या डोंगरावर झाडे जगविण्याची मोहीम..

Laxman Dhenge

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्यातील प्रचंड उन्हामुळे ढुम्या डोंगरावरील लहान-मोठी झाडे पाण्याअभावी जळून जाऊ नये म्हणून झाडे जगविण्यासाठी ढुम्या गिरिभ्रमण ग्रुपच्या सदस्यांनी दररोज झाडांना पाणी घालून झाडे जगविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे अनेक झाडांना जीवदान मिळत आहे. राजगुरुनगरजवळील ढुम्या डोंगरमाथ्यावर व खालच्या भागात अनेक लहान-मोठी झाडे आहेत. उन्हामुळे ही झाडे सुकू लागली होती. ही झाडे जगविण्यासाठी ढुम्या गिरीभ्रमण ग्रुपचे सदस्य पाच लिटर प्लॅस्टिक कॅनने झाडांना पाणी घालत आहेत. डोंगरउतार होताना काही झाडांच्या बुंध्याजवळ लहान मडक्यात पाणी ठेवून झाडे जगविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पाण्यामुळे झाडांना जीवदान

सध्या चासकमान धरणातून पाणी सोडल्याने डोंगर पायथ्यापासून गेलेल्या छोट्या कॅनॉलला पाणी आल्याने ढुम्या ग्रुपचे सदस्य कॅन भरून पाणी घेऊन झाडांना देत आहेत. तसेच माथ्यावरील टाकीतील पाणीदेखील झाडांना नित्यनियमाने दिले जात असल्याने झाडे जिवंत राहिली आहेत. झाडांना पाणी दिले नसते, तर अनेक झाडे जळून जाण्याचा धोका होता. परंतु, ढुम्या ग्रुप सदस्यांच्या प्रयत्नाने झाडांना जीवदान मिळत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT