Goodluck Cafe Pune Reopens
पुणे: अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांची पूर्तता केल्यावर ‘कॅफे गुडलक’ हे हॉटेल पुन्हा सुरू झाले आहे. ‘कॅफे गुडलक’मधील बन-मस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
याची गंभीर दखल घेत एफडीएने 14 जुलै रोजी तपासणी करून हॉटेलचा परवाना तात्पुरता निलंबित केला होता. एफडीएच्या सर्व अटी आणि नियमांची पूर्तता केल्यावर 12 दिवसांनी हॉटेल पुन्हा सुरू झाले आहे. (Latest Pune News)
नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील प्रसिद्ध ‘कॅफे गुडलक’मधील बन-मस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्याच्या प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) परवाना तात्पुरता निलंबित केला होता. सर्व त्रुटी दूर करून आवश्यक नियमांची पूर्तता केल्यानंतर एफडीएने पुन्हा परवाना मंजूर केला असून, गुडलक 25 जुलैपासून पुन्हा ग्राहकांसाठी खुले झाले आहे.
एफडीएच्या तपासणीमध्ये स्वच्छतेबाबतीत अनेक त्रुटी आढळल्या होत्या. उपाहारगृहातील स्वयंपाकघर अस्वच्छ होते, भिंती काळवंडल्या होत्या, फरशी तुटलेली होती तसेच कामगारांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रे नव्हती. त्यानंतर ’कॅफे गुडलक’ने सर्व त्रुटी दूर केल्या. स्वयंपाकघराची दुरुस्ती करण्यात आली, भिंती रंगविण्यात आल्या, तुटलेली फरशी बसविण्यात आली आणि पाणी साचण्याची समस्या दूर करण्यात आली. शिवाय, कामगारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करण्यात आली.
’कॅफे गुडलक’ने सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर परवाना पुन्हा देण्यात आला आहे. दरम्यान, लष्कर परिसरातील ’भिवंडी दरबार’ या हॉटेलने अद्याप त्रुटी दूर केल्या नसल्यामुळे त्यांचा परवाना अद्याप निलंबितच आहे.- सुरेश अन्नपुरे, एफडीएचे सहआयुक्त