Pune: माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या आई- वडिलांना, शिक्षकांना देते. ऐतिहासिक अशा मुलींच्या पहिल्या तुकडीची कॅडेट असल्याचा अभिमान वाटतो. हा क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. माझे हे यश माझ्यासारख्या सशस्त्र सैन्यदलात येऊ पाहणार्या मुलींना निश्चित प्रेरणा देईल, अशी भावना रौप्यपदक मिळविणार्या एनडीएतील मुलींच्या पहिल्या तुकडीतील कॅडेट श्रीती दक्ष हिने व्यक्त केली.
श्रीतीच्या यशाचे सगळीकडून कौतुक होत आहे. पदवीप्रदान समारंभानंतर तिच्याशी संवाद साधला असताना, हे यश माझ्या एकटीचे नसून त्यात आईचा मोठा वाटा असल्याचे तिने सांगितले. तर तिचे वडील विंग कमांडर (निवृत्त) योगेशकुमार दक्ष यांनी मुलीने आपला वारसा पुढे नेल्याचा आनंद आहे, अशी भावना व्यक्त केली.
आपल्या प्रवासाबद्दल बोलताना श्रीती म्हणाली, आम्ही मूळचे हरियाणाचे आहोत. पण, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही नोएडा येथे वास्तव्यास आहोत. माझे शालेय शिक्षण नोएडातील शाळेत झाले. मी दहावीत 97 टक्के तर बारावीत 99 टक्के प्राप्त केले. वडिलांकडून आलेला वारसा पुढे चालविण्यासाठी मी एनडीएत प्रवेश घेतला. सुरुवातीला एनडीएमध्ये प्रशिक्षण घेताना इथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास थोडा वेळ लागला, मात्र त्यानंतर येथील शिक्षक, वरिष्ठ छात्रांमुळे सर्वच एकरूप झाले. माझे वडील योगेशकुमार दक्ष हे सेवानिवृत्त विंग कमांडर आहेत. ते एनडीएच्या 86 व्या तुकडीचे भाग होते. माझी आई शिक्षिका आहे, तर मोठी बहीण ही वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. मला कुटुंबातूनच सैन्यदलाचा वारसा मिळाला आणि हाच वारसा मी पुढे नेत आहे. मी आता इंडियन मिलिट्री अकादमी (आयएमए) येथे पुढील प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे.
मुलीच्या यशाबद्दल तिच्या आईनेही आनंद व्यक्त केला, मुलीचे यश पाहतानाचा क्षण हा अभिमानाचा आहे. तिला मार्गदर्शन करणार्या प्रत्येकाचे धन्यवाद, अशी भावना तिच्या आईने व्यक्त केली.
मुलीच्या यशाबद्दल वडील योगेशकुमार दक्ष म्हणाले, माझ्या मुलीने हे यश मिळवले याचा अभिमान आहे. मी वायुसेनेत काम केले आणि माझी मोठी मुलगीही वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. मोठ्या मुलीने माझा वारसा पुढे नेला आणि आता श्रीतीसुद्धा हा वारसा पुढे नेत असल्याचा आनंद आहे. ती पुढे आयएमए जॉईन करणार आहे. तिथेही ती यश मिळवेल असा विश्वास आहे.