निनाद देशमुख
पुणे: शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. ही कामे करताना नियमांची पायमल्ली होत असल्याचे समोर आले आहे. बांधकामांचे पाणी थेट ड्रेनेजमध्ये सोडले जात असून, हे करण्यासाठी थेट झाकणे फोडून त्यात पाणी सोडले जात आहे. या गंभीर प्रकाराकडे पालिकेच्या पथ विभागाने दुर्लक्ष केले आहे.
देशातील पहिले स्मार्ट शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. या स्मार्ट शहराचा नियोजनबद्ध विकास होणे गरजेचे असताना नियम धाब्यावर बसवून कामे केली जात आहे. शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. ही बांधकामे करताना अनेक व्यावसायिकांकडून शहरातील गटारांची तोडफोड केली जात आहे. (Latest Pune News)
बांधकाम करण्यासाठी पाया खोदताना मोठ्या प्रमाणात भूजल बाहेर येत असून, हे पाणी थेट गटारांत सोडले जात आहेत. अनेक ठिकाणी चेंबरची झाकणे तोडून पाइप थेट ड्रेनेज लाइनमध्ये सोडले जात आहे. यामुळे ड्रेनेजचे नुकसान होत आहे. हे करताना पालिकेची कोणतीही परवानगी घेतली जात नाही.
ड्रेनेजची झाकणे तोंडल्यामुळे त्यावर खड्डा पडून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या बाबत पालिकेच्या पथविभागाने कारवाई करणे अपेक्षित असताना या प्रकराकडे पालिकेच्या यंत्रणेने डोळेझाक केली आहे.
शहरात एकीकडे पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त असतांना बांधकाम व्यावसायिकांच्या या प्रतापामुळे रस्त्यावरील ड्रेनेजला मोठी छिद्रे पडली आहेत. या बाबत पथविभागाच्या अधिकार्यांना विचारले असता ते या बाबत अनभिज्ञ असल्याचे आढळले.
अपघात होण्याची शक्यता
पुण्यात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. शहरात ड्रेनेजची झाकणे तोडून त्यात पाणी सोडल्या जात असल्याने मोठा पाऊस होऊन रस्त्यावर पाणी साठल्यास या तुटलेल्या ड्रेनेजमध्ये पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
भूजलाचा होतोय अपव्यय
पुण्यात अनेक बांधकाणे सुरू आहेत. ही बांधकामे करताना पाया खोदला जातो. जमिनीच्या आत खोल हा पाया खोदला जात असल्याने भूजलवर येत आहे. या भूजलाचा पुनरवापर करणे अपेक्षित असताना बांधकाम व्यावसायिकांकडून हे पाणी थेट गटारात सोडले जात आहे. यामुळे भूजल पातळीवर गंभीर परिणाम होत असून गोड्या पाण्याचा अपव्यय होत आहे.
शहरात ड्रेनेजची झाकणे फोडून त्यात पाणी सोडले जात असल्याचा प्रकार गंभीर आहे. हे पाणी गटारात सोडल्यामुळे एचटीपीवर ताण येऊ शकतो. त्यामुळे हे पाणी गटारात न सोडता पावसाळी वाहिन्यात सोडणे अपेक्षित आहे. तसेच ड्रेनेजची झाकणे फोडून जर पाणी सोडले जात असेल तर या बाबत पाहणी करून अशा ठेकेदार अथवा बांधकाम व्यावसायिकांना यासंदर्भात नोटिसा देऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.- अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख, पुणे महानगरपालिका
शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यात काही बांधकाम व्यावसायिकांकडून ड्रेनेजची झाकणे तोडून त्यात पाणी सोडले जात आहे. हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अशा व्यावसायिकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.- देविदास फुलपगार, रहिवासी, कसबा मतदारसंघ