Pune Latest Crime News: पुण्यातील उद्योजकाला ई-मेलद्वारे संपर्क साधून 100 कोटींची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने पाटणा येथे बोलावून घेतले आणि अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लक्ष्मण साधू शिंदे (वय 55, रा. कोथरूड) असे खून झालेल्या उद्योजकाचे नाव आहे.
याबाबत त्यांच्या घरच्यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. शिंदे हे रत्नदीप कास्टिंग्जचे संस्थापक आहेत. तसेच ते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे (सीओईपी) माजी विद्यार्थी होते. विशेष प्रकारचे कास्टिंग घटक तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांना झारखंडमधील खाण प्रकल्पासाठी सुमारे 100 कोटींच्या ऑर्डरची विचारणा करणारा ई-मेल आला. हा प्रस्ताव विश्वासार्ह वाटल्याने त्यांनी संबंधित खाणीच्या ठिकाणी जाण्याचे ठरविले होते. त्यानुसार शिंदे यांना पुढील लोकांनी चर्चेसाठी पाटणा येथे बोलावले. त्यानुसार 11 एप्रिलला शिंदे पाटणा येथील एअरपोर्टवर पोहचले. त्यांनी जाता जाता मुलीला फोन करून व्यवसायाशी संबंधित कामानिमित्त पाटणा येथे जात असल्याचे सांगितले. (Latest Pune News)
रात्री सुमारे 10 वाजल्यापासून त्यांचा संपर्क तुटला. सतत फोन करूनही त्यांचा फोन लागत नसल्याने त्यानंतर मुलीने बारा फोन करूनही वडिलांचा फोन लागत नसल्याने दि. 12 एप्रिल रोजी कोथरूड पोलिस ठाण्यात त्यांच्या अपहरणाची तक्रार दिली. या प्रकारानंतर पुणे पोलिसांची एक टीम पाटणा येथे रवाना करण्यात आली आहे.
पाटणा एअरपोर्टवर गेल्यावर पुणे पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एअरपोर्टवरूनच शिंदे यांचे अपहरण केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पाटणा विमानतळ पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. मोबाईल लोकेशनच्या आधारे पुणे पोलिसांनी आणि पाटणा पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे लोकेशन गुन्हेगारीचा पट्टा समजल्या जाणार्या परिसरात आढळून आले.
शिंदे यांचा शोध घेत असताना बिहार येथील जहानाबाद येथील घोसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिंदे यांचा मृतदेह 14 एप्रिलला सापडला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार 12 एप्रिलला त्यांचा खून करण्यात आला असण्याची शक्यता आहे. बिहार पोलिस आणि पुणे पोलिस या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्वांची ओळख पटवून पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी काही जणांना पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुलीशी संपर्क तुटण्याअगोदर आरोपी मुलीसोबत बोलले
शिंदे यांचे अपहरण झाल्यानंतर मुलीसोबतही आरोपींचे बोलणे झाले होते, ते त्यांना झारखंड येथील खाण दाखविण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी फोनवर सांगितले होते. मात्र, या बोलण्यानंतर फोनच बंद झाल्याने शिंदे यांच्या घरच्यांनी याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
आरोपींनी शिंदे यांच्या बँक खात्यातून 90 हजार रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, त्यांचा मृतदेह बिहार येथील जहानाबाद जिल्ह्यात सापडला आहे. अधिक तपासामध्ये गुजरातच्या व्यापार्यालाही अशाच प्रकारे बिहार येथे बोलावून त्याचे अपहरण करून त्याच्याकडील अडीच लाख रुपये मारहाण करून जबदरस्तीने काढून घेतले होते. नंतर त्याला सोडूनही देण्यात आले होते. असाच प्रकार या गुन्ह्यात झाल्याचे दिसून येत आहे. यानिमित्त आरोपींची गुन्हा करण्याची पद्धतीही समोर आली आहे.- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे