पुणे: पीएमपीच्या बसचालक आणि वाहकांना कामावर येताना आता फोनवरून हजेरी लावता येणार नाही. त्यांना नियोजित वेळेत प्रत्यक्ष आगारात येऊनच हजेरी लावावी लागणार आहे, असे आदेश पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी काढले आहेत.
पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या निर्देशानुसार हा बदल करण्यात आला आहे. काही आगारांमध्ये टाईमकिपर आणि मदतनीस कर्मचारी सकाळ-दुपारच्या पाळीतील चालक आणि वाहकांची हजेरी मोबाईल फोनवरून घेत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. ही बाब गंभीर असून प्रशासकीय कामकाजासाठी योग्य नसल्याचे म्हणत पीएमपीने हे आदेश काढले. (Latest Pune News)
गव्हाणे म्हणाले, यापुढे सर्व आगार व्यवस्थापक, टाईमकिपर आणि मदतनीस सेवकांनी याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जे कर्मचारी वेळेवर आगारात येतील, त्यांचीच हजेरी घेऊन त्यांना कामावर पाठवावे. जर या नियमाचे पालन झाले नाही, तर संबंधित आगार व्यवस्थापक, टाईमकिपर आणि मदतनीस सेवकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.