पुणे

सायन्स सिटी पिंपरी-चिंचवड शहरातच उभारा : खासदार श्रीरंग बारणे

अमृता चौगुले

पिंपरी : चिंचवड येथील सायन्स पार्क शेजारील जागेत प्रस्तावित असलेली भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी (सायन्स सिटी) पुण्यातील मुंढव्यात उभारण्याच्या प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु आहेत. त्याला शहरवासीयांचा तीव्र विरोध आहे. सायन्स सिटी पिंपरी-चिंचवडमध्येच उभारा, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य शासनाकडे केली. त्यासाठी एमआयडीसी जागा देण्यास अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले.

सायन्स सिटीसाठी पुण्यातील जागेचा शोध' असे वृत्त पुढारीने 21 ऑगस्टला प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन खा. बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेवून निवेदन दिले आहे.

मुंढव्यातील जागेला नागरिकांचा विरोध
राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड शहरात भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय 1 सप्टेंबर 2019 मध्ये घेतला. चिंचवड येथील सायन्स पार्क व तारांगणच्या शेजारील जागेत ही सायन्स सिटी उभारली जाणार होती. त्यासाठी जागा देण्याबाबत महापालिका आयुक्तांनी लेखी संमती दिली आहे. सायन्स पार्कला भेट देण्यासाठी राज्यभरातून तीन लाख विद्यार्थी वर्षाला येतात. त्यामुळे याच्या बाजूला होणार्‍या सायन्स सिटीचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. परंतु, ही सायन्स सिटी मुंढव्यातील गोठ्यांच्या पुनर्वसनासाठी आरक्षीत असलेल्या 25 एकर जागेवर उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला शहरातील नागरिकांचा विरोध आहे. सायन्स सिटी पिंपरी-चिंचवडमध्येच उभारावी. त्याबाबतच्या महापालिकेच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी खा. बारणे यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांना होणार फायदा
केंद्र सरकारची कोणतीही मदत न घेता गुजरात राज्याने विज्ञान केंद्र उभारले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही सायन्स पार्क उभारले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठे उद्योजक आहेत. त्यांच्या मदतीने व्हर्टीकल सायन्स सिटी उभी करता येईल. महापालिकेने तसे नियोजन केले आहे. जागा कमी पडत असल्यास एमआयडीसीची जागा देण्याची तयारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दर्शविली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडला डावलून सायन्स सिटी पुण्यात नेण्याचा प्रयत्न काही शासकीय अधिकरी करत आहेत. दुर्दैवाने त्याला काही लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे. हा पिंपरी-चिंचवडवर अन्याय आहे. हा प्रकल्प पिंपरीत झाल्यास शहरात मोठी विज्ञाननगरी होईल. शहरातील मुलांना त्याचा लाभ होईल. पिंपरी-चिंचवडमध्ये सायन्स सिटी उभारण्यास मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, शिक्षणमंत्री अनुकूल आहेत, असे खा. बारणे यांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT