DP Road Land Acquisition Pudhari
पुणे

DP Road Land Acquisition: मुंढव्यातील बी. टी. कवडे रोड ते भीमनगर रस्त्याचा मार्ग मोकळा; २६ मिळकतधारकांना नोटिसा

२४ मीटर रुंदीच्या डीपी रस्त्याच्या भूसंपादनाला मंजुरी; पुढील सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

नितीन वाबळे

मुंढवा: बी. टी. कवडे रोड ते भीमनगर यांना जोडणाऱ्या २४ मीटर रुंदीच्या डीपी रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. रस्त्याच्या हद्दीचा तिढा सोडविण्यासाठी नगर भूमापन कार्यालयाकडून मोजणी आणि हद्दीची पडताळणी पूर्ण करण्यात आली.

त्यानंतर हा प्रस्ताव शासनाच्या विशेष भूमी संपादन शाखेकडे पाठविण्यात आला. त्यानंतर या शाखेने भूसंपादन कायद्याच्या कलम १९ अंतर्गत घोषणापत्राला मंजुरी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन शाखेकडे पाठविलेल्या प्रस्तावाला आता मंजुरी मिळाली आहे. बी. टी. कवडे रोड ते भीमनगरला जोडणारा हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे.

मात्र, रस्त्याची हद्द निश्चित करणे, मोजणी आणि भूसंपादनातील विलंब, यामुळे काम रखडले होते. परिणामी, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून, परिसरातील वाहतुकीचाही प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन शाखेने या प्रस्तावाला आता मंजुरी दिली आहे. त्यामुळे शासनाच्या विशेष भूमी संपादन शाखेकडून रस्त्याच्या जागेत बाधित होणाऱ्या २६ मिळकतधारकांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

दरम्यान, बाधित मिळकतधारकांना नोटीस बजावल्यानंतर भूसंपादनाची पुढील कार्यवाही केली जाणार आहे. विशेष भूमी संपादन शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील सहा महिन्यांत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला हा रस्ता मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

भूसंपादन प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे

  • रस्त्याच्या हद्दीची मोजणी व पडताळणी पूर्ण.

  • भूसंपादन प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाखेची मंजुरी.

  • कलम १९ अंतर्गत घोषणापत्राच्या प्रक्रियेला मान्यता.

  • बाधित २६ मिळकतधारकांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू.

  • पुढील सहा महिन्यांत रस्ता पूर्ण करण्याचे नियोजन.

भूसंपादन प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले असून, बाधित २६ मिळकत धारकांना नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील जास्तीत जास्त सहा महिन्यांत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
श्वेता दारुणकर, विशेष भूमी संपादन अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT