परिंचे: श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील वीर धरणाखालून वाहणार्या निरा नदीवरील पूल सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. सन 1958 मध्ये बांधण्यात आलेल्या या पुलाला तब्बल 65 वर्षे पूर्ण झाली असून, आजपर्यंत एकदाही त्याचे ऑडिट, तपासणी अथवा डागडुजी करण्यात आलेली नाही.
हा पूल पुणे आणि सातारा जिल्ह्याची सीमारेषा दर्शवितो. पुलाच्या अलीकडे पुणे, तर पलीकडे सातारा जिल्हा आहे. दररोज 24 तास, वर्षभर या पुलावरून अवजड व सामान्य वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. (Latest Pune News)
पूल नदीपात्रापासून अतिशय कमी उंचीवर असून, दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे नाहीत तसेच दिशादर्शक फलक, रेडियम पट्ट्या नसल्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा पूल पाण्याखाली गेला असताना अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
अनेकदा वाहने थेट नदीपात्रात कोसळल्याचे प्रकार घडले आहेत. वीर धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर काही काळ पूल वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागतो. सार्वजनिक बांधकाम अभियंता स्वाती दहिवाल यांच्याशी संपर्क करण्याचा पत्रकार व नागरिकांचा प्रयत्न वारंवार अपयशी ठरतो. त्यांच्याकडून फोन उचलण्याचेही सौजन्य दाखविले जात नाही, अशी जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.
पुलाचा इतिहास आणि सार्वजनिक दुर्लक्ष
धरणाचे काम सुरू असताना हा पूल बांधण्यात आला होता. धरण प्रशासनाच्या मालकीत असलेला रस्ता आणि पूल सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सार्वजनिक वापरासाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र, देखभालीबाबत विभागाचे दुर्लक्ष स्पष्टपणे जाणवते.
ग्रामपंचायतीची सातत्यपूर्ण मागणी
‘निरा नदीवरील हा अरुंद पूल वाहतुकीसाठी धोकादायक असून, पुलाची उंची वाढवून संरक्षक कठडे बसवावेत, यासाठी ग्रामपंचायतीकडून वारंवार मागणी केली जात आहे. पण, संबंधित विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करतो आहे,’ अशी नाराजी सरपंच मंजूषा धुमाळ यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर
पुरंदर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागावर ‘पालथ्या घड्यावर पाणी’ अशी टीका होत आहे. धोकादायक पूल, धोकादायक झाडे किंवा इतर समस्या असो, अधिकार्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नाही.