पुणे

पुणे : समान पाणीपुरवठा योजनेच्या मीटरला ब्रेक!

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत बसविण्यात येणार्‍या पाणीमीटरला विरोध वाढला आहे. आजवर दीड लाख पाणीमीटर बसणे आवश्यक असताना केवळ 62 हजारच मीटर बसविण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

शहरातील नागरिकांना मुबलक, समान पाणीपुरवठा करण्यासाठी आणि पाणीगळती थांबविण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. पुढील 30 वर्षांचा विचार करून योजनेची आखणी केली आहे. योजनेंतर्गत शहरात 86 पाणी साठवण टाक्या, 1668.72 किमी लांबीची पाइपलाइन आणि 3 लाख 18 हजार 574 पाणीमीटर बसविण्यात येणार आहेत. मात्र, या योजनेच्या प्रवासात सुरुवातीपासूनच कोणत्या ना कोणत्या प्रकारचे विघ्न येत आहे. सगळ्या अडचणींवर मात करून योजनेचे काम जोमात सुरू आहे. मात्र, अपेक्षित गतीने कामे होत नाहीत. या कामामध्ये सर्वाधिक अडचणी माननीयांकडूनच होत असल्याचे वारंवार समोर आले आहे.

आता महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्याने आणि महापालिका निवडणुकीसंदर्भात अनिश्चितता आहे. त्यामुळे माननीयांची व राजकीय मंडळींची आडकाठी दूर झाल्याने योजनेची कामे गतीने सुरू आहेत. मात्र, महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय इच्छुक पुन्हा कामाला लागले आहेत. याची झळ मात्र समान पाणीपुरवठा योजनेच्या पाणीमीटर बसविण्याच्या कामाला बसत आहे.

नागरिकांवर प्रभाव पाडण्यासाठी इच्छुकांकडून पाणीमीटर बसविण्यास विरोध केला जात आहे. हा विरोध मागील काही दिवसांपासून वाढल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍याने सांगितले. योजनेतील इतर कामे 55 टक्के पूर्ण झालेली असताना पाणीमीटर बसविण्याचे काम मात्र 25 टक्क्यांच्या आतच आहे. निवासी आणि व्यावसायिक मिळकतींना आजवर 50 टक्के याप्रमाणे किमान दीड लाख मीटर बसणे अपेक्षित होते.

SCROLL FOR NEXT