पुणे : डंपरच्या चाकाखाली सापडल्याने बहिणीसोबत क्लासला निघालेल्या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी खराडीतील झेन्सार ग्राउंडसमोरील रस्त्यावर घडली. रस्त्यावर गतिरोधक आल्याने डंपरचालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे ही घटना घडली. याप्रकरणी खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून डंपरचालकाला अटक केली आहे.
अंशुमन अनुपकुमार गायकवाड (वय 11, रा. केशवनगर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे, तर राजाराम दयाराम राठोड (वय 48, रा. वडगाव शेरी) असे अटक केलेल्या डंपरचालकाचे नाव आहे. याबाबत अंशुमनची बहीण तन्मयी अनुपकुमार गायकवाड (वय 23) यांनी फिर्याद दिली आहे. (pune News Update)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अंशुमन आणि त्याची बहीण दुचाकीवरून प्रवास करीत होते. अशुमनला क्लासला सोडण्यासाठी जात असताना झेन्सार ग्राउंड येथे समोर गतिरोधक आल्याने डंपरचालकाने पाठीमागे न बघता अचानक ब—ेक मारला. त्यामुळे पाठीमागून येत असलेल्या तरुणीचे नियंत्रण सुटले आणि डंपरला धडकून दोघेही गाडीवरून पडले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. अंशुमन हा पाठीमागील चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खराडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. डंपरचालकला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय चव्हाण यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तांगडे करीत आहेत.
शहरात हायवा आणि टिपरचालकांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. चार दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तांनी शहरात दिवसा हायवा, डंपर, टिपर फिरू न देण्याचे आणि राजकीय दबावाला बळी न पडण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले होते. मात्र, त्यानंतर तिसर्याच दिवशी हायवाचालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला. यावरून डंपरचालक आयुक्तांच्या आदेशालाही जुमानत नसल्याचे दिसते. यापूर्वीही अनेक अपघात झाले असून, पोलिसांनी कठोर कारवाई करून शहरातील यांचा वावर बंद करण्याची मागणी होत आहे.