

कोल्हापूर : शेताला पाणी देऊन चालत घरी जाणार्या विकास आकाराम पाटील (वय 32, रा. खोकुर्ले, ता. गगनबावडा) या शेतकर्याचा भरधाव वाहनाने ठोकरल्याने मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते; मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
खोकुर्ले येथील भराडी नावाच्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी पाटील शनिवारी रात्री उशिरा गेले होते. पाणी देऊन मध्यरात्री दोन वाजता ते चालत कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरून घराकडे परतत असताना नरसोबा- महादेव मंदिराजवळ भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली.
बेशुद्धावस्थेत ते रस्त्यावर कोसळले होते. हा प्रकार समजताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. अपघातानंतर वाहनासह चालक पसार झाल्याचे सांगण्यात आले. सीपीआर पोलिस चौकीमध्ये या घटनेची नोंद झाली आहे.