पुणे: धनत्रयोदशीपासून न्यायालयांना दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्याची महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. शुक्रवार (दि. ६) पासून दिवाळीच्या सुट्या सुरू करण्याची विनंती बार कौन्सिलने केली होती. मात्र, जिल्हा न्यायालये आणि इतर न्यायिक आस्थापनांकडून प्राप्त झालेल्या मतांचा विचार करून मुख्य न्यायमूर्तींनी ही मागणी फेटाळली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धनत्रयोदशीपासून न्यायालयांना सुट्या मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने दि. २ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालय प्रशासनाला दोन पत्रे पाठविली होती. या मागणीसंदर्भात जिल्हा न्यायालये तसेच इतर न्यायिक आस्थापनांकडून प्राप्त झालेली मते आणि प्रतिक्रिया मुख्य न्यायमूर्तींसमोर विचारार्थ ठेवण्यात आल्या.
त्यांचा विचार केल्यानंतर सुट्या नियोजित वेळेपूर्वी सुरू करण्याची मागणी मान्य करण्यात आली नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक (निरीक्षण-२) संजयकुमार व्ही. जाधव यांनी बुधवारी बार कौन्सिलच्या अध्यक्षांना पत्र पाठवून या निर्णयाची माहिती दिल्याचे महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या सदस्या ॲड. माधवी पोतदार यांनी सांगितले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जामीन, पॅरोल तसेच कौटुंबिक न्यायालयात मुलांचा ताबा मिळविण्यासाठी पक्षकारांची लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत एक दिवस अचानक सुट्या जाहीर झाल्या असत्या, तर न्यायालयीन कामकाज विस्कळीत होऊन पक्षकारांची गैरसोय वाढली असती. सुट्यांबाबत महिनाभर आधीच नियोजन करून पाठपुरावा केला असता, तर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आहे.ॲड. गणेश माने, माजी सदस्य, पुणे बार असोसिएशन