पौड : पुढारी वृत्तसेवा : जामगाव (ता. मुळशी) येथे चार वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंच यांनी गावातील डोंगरावर तयार झालेल्या प्लॉटिंगवर गावातील रस्त्यावरून जाण्यासाठी ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव न घेता संबंधित कंपनीला बेकायदेशीररीत्या ना हरकत
प्रमाणपत्र दिले. ही माहिती विद्यमान सरपंच विनोद सुर्वे यांनी उजेडात आणली आहे. चार वर्षांपूर्वी जामगाव येथे पाच कंपन्यांनी मिळून 50 एकरपेक्षा जास्त जागा घेऊन त्यावर प्लॉटिंग केले. या ठिकाणी जाण्यासाठी गावचा रस्ता ग्रामपंचायतीची कुठल्याही प्रकारची परवानगी किंवा ठराव न घेता वापरासाठी बेकायदेशीररीत्या कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र दिले. हा गावातील रस्ता आता प्लॉटिंगधारकांना कायमस्वरूपी वापरण्यासाठी देण्यात येत आहे.
यापुढे निवडून येणार्या सर्व ग्रामपंचायत कमिटीला हा निर्णय बंधनकारक राहील तसेच ग्रामस्थांनी यात आडकाठी आणल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ग्रामपंचायतीकडून केली जाईल, असे नाहरकत प्रमाणपत्र तत्कालीन सरपंच अलका शंकर ढाकूळ यांनी संबंधित कंपनीला दिले होते. चार महिन्यांपूर्वी निवडून आलेले सरपंच विनोद सुर्वे यांनी या घटनेची माहिती घेतली. त्यांना हे प्रकर संशयास्पद वाटल्यानंतर त्यांनी याची तक्रार मुळशीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्याकडे केली. याची दखल घेत स्वतः गटविकास
अधिकारी सुधीर भागवत यांनी जामगाव ग्रामपंचायतीमध्ये जाऊन दप्तर तपासणी केली, तसेच तत्कालीन सरपंच यांना खुलासा सादर करण्याचा आदेश दिला होता.
यावर तत्कालीन सरपंच यांनी कोणताही खुलासा केला नाही. नंतर गटविकास अधिकारी भागवत यांनी 27 फेब्रुवारीला संबंधित कंपनीचे नाहरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने मासिक सभेत ठराव करून ते रद्द करावे, तसेच तत्कालीन सरपंच अलका शंकर ढाकूळ यांच्यावर ग्रामपंचायतीची फसवणूक केली म्हणून सरपंच विनोद सुर्वे यांनी ग्रामपंचायतीची बैठक घेऊन गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिले आहेत.
संबंधित कंपन्यांनी डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून उत्खनन केले आहे. यामुळे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बदललेले आहेत. परिणामी जामगावला धोका निर्माण झालेला आहे. शेतात जाण्यासाठी स्थानिक नागरिकांचे रस्तेही अडविण्यात आलेले आहेत. कंपनीने प्रवेशव्दारावरच सुरक्षारक्षक तैनात ठेवलेले आहेत. वेळोवेळी वनविभाग, महसूल विभाग यांच्या निदर्शनास या गोष्टी आणून देण्यात आल्या आहेत.
– विनोद सुर्वे, सरपंच, जामगाव
हा रस्ता टाटा पॉवर कंपनीच्या मिळकतीमधून जात आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली होती. टाटा कंपनीकडून परवानगी घेऊन शासकीय निधी वापरून हा रस्ता करण्यात आला आहे. झालेले निर्णय हे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करूनच केलेले आहेत.
– अलका शंकर ढाकूळ, माजी सरपंच, जामगाव
हेही वाचा