पुणे

शिवछत्रपती पुरस्‍कारातून शरीरसौष्ठव खेळाला वगळले; संघटनांमध्ये नाराजी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शरीरसौष्ठव या खेळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या प्रतिष्ठित 'शिवछत्रपती' क्रीडा प्रकार पुरस्काराकरिता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शरीरसौष्ठव खेळातील सर्व संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार महेश लांडगे, कार्याध्यक्ष संजय मोरे आणि सरचिटणीस अजय खानविलकर यांनी पत्रक काढून शासनाच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे.

लांडगे म्हणाले, गेली अनेक दशके शरीरसौष्ठव व फिटनेस हा क्रीडा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. शरीरसौष्ठव व फिटनेस या खेळाचा संपूर्ण महाराष्ट्रातील खेडोपाड्यात प्रचार व प्रसाराचे कार्य अनेक वर्षांपासून महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून केले जात आहे. शरीरसौष्ठव व फिटनेस या खेळाच्या अनेक राष्ट्रीय, आशियाई व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले आहे. शरीरसौष्ठव खेळाचा समावेश 2002 च्या आशियाई खेळामध्येही समाविष्ट होता व आताही ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया यांच्या वतीने आयोजित आशियाई बीच गेममध्ये समाविष्ट आहे. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न असलेल्या इंडियन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशनचा संघ आशियाई बीच गेममध्ये सहभागी होत असतो, असेही त्यांनी सांगितले.

आजपर्यंत यांचा सन्मान

पुरुषांमध्ये प्रकाश कोयंडे, रमाकांत दळवी , मधुकर थोरात, दिनकर जोशीलकर, प्रकाश नाईक, आनंद गोसावी, शाम रहाटे, अनिल राऊत, मंदार चवरकर, सुहास खामकर, संग्राम चौगुले, महेंद्र पगडे, दुर्गाप्रसाद दासरी, विजय मोरे, अजिंक्य रेडेकर, सचिन गलांडे, राजेश इर्ले तर महिलांमध्ये करुणा वाघमारे, दिव्यांग खेळाडू योगेश मेहेर आदी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटूंचा पुरस्कार देऊन शासनाने सन्मान केला आहे.

संघटनेशी विचार विनिमय न करता त्याच प्रमाणे आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव संघटनांच्या अधिकृत मान्यता लक्षात न घेता परस्पर घेतलेल्या या निर्णयामागे कोणते गौडबंगाल आहे हे न कळण्यासारखं आहे. या निर्णयामुळे अनेक गुणवान खेळाडूंवरती अन्याय होईलच, पण या खेळाच्या व खेळाडूंच्या माध्यमातून शरीरसौष्ठव व फिटनेस या खेळाचा खेडोपाड्यांमध्ये होणार्‍या प्रसाराला व आपला समाज सदृढ व बलशाली बनविण्याच्या कार्याला व भारत सरकारच्या फिट इंडिया चळवळीला नैराश्य येईल. आमच्या खेळावर आणि आमच्या खेळाडूंवर अन्याय करणार्‍या अशा कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि अशा अन्यायाविरुद्ध आगामी काळात लढा देण्यात येईल.

– संजय मोरे, सरचिटणीस, इंडियन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशन, पुणे

शरीरसौष्ठव क्रीडा प्रकार हा पूर्वी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये होता. परंतु, आता ऑलिम्पिक स्पर्धेतील शरीरसौष्ठव स्पर्धा वगळण्यात आली आहे. त्यामुळे शिवछत्रपती पुरस्कारामधूनही शरीरसौष्ठव क्रीडा प्रकार वगळण्यात आला आहे.

– सुहास दिवसे, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT