कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. शुक्रवारी (दि.10) भर पावसात शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा गेट नाक्यावर पोलिस व प्रशासनाकडून चारचाकी व दुचाकी वाहनांची कसून चौकशी सुरू होती. शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा गेट नाक्यावर 24 तास पोलिस व प्रशासन यांचे पथक कार्यरत असून त्यांच्यामार्फत अवैध रोकड, अंमली मद्यपदार्थ, हत्यारे यांना प्रतिबंध करण्यासाठी चारचाकी व दुचाकी वाहनांची कसून चौकशी केली जात आहे.
सोमवारी (दि.13) पुणे लोकसभा निवडणूक पार पडत आहे. निवडणूक काळात उमेदवारांकडून मतदारांना पैशाची लालूच दाखविणे तसेच आचारसंहितेचा भंगाचे गैरप्रकार घडण्याची शक्यता असते, त्यांना आळा बसावा यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने कसबा विधानसभाअंतर्गत शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा परिसर तसेच स्वारगेट परिसरातील नटराज हॉटेल याठिकाणी तपास नाका तयार करण्यात आला. तेथे पोलिसांकडून चारचाकी-दुचाकी प्रत्येक संशयास्पद वाहनांची कसून चौकशी होत आहे. गाडी नंबर, फोन नंबर, नावांची रजिस्ट्ररमध्ये नोंद केली जात आहे.
शिवाजी रस्त्यावरील या पथकामध्ये तीन पोलिस कर्मचारी, निवडणूक अधिकारी व एक व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाकडून शिवाजी रस्त्यावरील ये-जा करणार्या खासगी वाहनांची व्हिडीओ शूटिंग करीत असून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. ही पथके 24 तास कार्यरत असून त्यांच्यामार्फत अवैध रोकड, अंमली पदार्थ, हत्यारे यांना प्रतिबंध करण्यासाठी चारचाकी व दुचाकी वाहनांची कसून चौकशी केली जात आहे.
हेही वाचा