पुणे

महापालिकेत वर्गीकरणाचा धडाका; उड्डाणपुलांचा निधी मेट्रोला

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आर्थिक वर्ष संपण्यास केवळ तीन आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद केलेला निधी लॅप्स होऊ नये, यासाठी एका कामासाठी तरतूद केलेला निधी दुसर्‍या कामासाठी वर्गीकृत करण्याचा धडाका सध्या प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. पुणे महापालिकेतर्फे महामेट्रोला देय असलेल्या 30 कोटी रुपयांसाठी अन्य प्रकल्पांच्या कामातून रकमेचे वर्गीकरण करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. 23-24 च्या अर्थसंकल्पातील प्रकल्प विभागाच्या साधू वासवानी पूल ते बंडगार्डन पूल यादरम्यानच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यासाठीचे 15 कोटी रुपये आणि प्रकल्प विभागामार्फतच शहरात विविध ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठीचे 15 कोटी रुपये, अशा 30 कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

भटक्या व मोकाट कुर्त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया तसेच डुकरांच्या नियंत्रणासाठी संस्थांची मासिक देयके देण्यासाठी दोन कोटी 81 लाख 41 हजार रुपयांची आवश्यकता होती. आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी कुत्र्यांच्या नसबंदी पॉण्ड्सची संख्या वाढविण्यासाठीचे एक कोटी रुपये, डॉग पॉण्ड व पशुवैद्यकीय दवाखाना निविदा पद्धतीने चालविण्यासाठीचे 21 लाख 41 हजार आणि मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठीच्या प्रकल्पासाठीचे एक कोटी रुपये, कारकस युटिलायझेशन रेन्डरिंग प्लांट व इन्सिनरेटरसाठीचे 40 लाख व कत्तलखान्यातील जनावरांसाठी शेड उभारण्यासाठीचे 20 लाख, या रकमेच्या वर्गीकरणास मान्यता देण्यात आली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT