मंचरच्या स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा कळस; अंत्यविधीच्या ठिकाणी चाकू, लिंबू, नारळ, टाचण्या Pudhari
पुणे

Manchar Black Magic: मंचरच्या स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा कळस; अंत्यविधीच्या ठिकाणी चाकू, लिंबू, नारळ, टाचण्या

अंत्यविधीच्या ठिकाणी चाकू, लिंबू, नारळ, कोहळे, हळदी, कुंकू, टाचण्या, दाभण, गोवर्‍या जळालेल्या आढळल्या

पुढारी वृत्तसेवा

Superstition at Manchar cremation site

मंचर: मंचर (ता. आंबेगाव) येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा कळस झाला आहे. जादूटोण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. अंत्यविधी झालेल्या ठिकाणी चाकू, लिंबू, नारळ, कोहळे, हळदी, कुंकू, टाचण्या, दाभण, गोवर्‍या इत्यादी वस्तू सोमवारी (दि. 30) सकाळी जळालेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

शेवाळवाडी येथील नानाभाऊ श्रीपती थोरात (वय 85) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी (दि. 27) निधन झाले होते. त्यांचा अंत्यविधी मंचर येथील स्मशानभूमीत करण्यात आला. तीन दिवसांनी म्हणजे सोमवारी (दि. 30) थोरात कुटुंबीय, नातेवाईक सावडण्यासाठी सकाळी मंचर स्मशानभूमीत आले असता त्यांना अंत्यविधी झालेल्या ठिकाणी राखेत लिंबू, नारळ, कोहळे, सुरी, बांगड्या, हळदी-कुंकू, टाचण्या, दाभण इत्यादी वस्तू आढळून आल्या. स्मशानभूमीत हा प्रकार घडल्याने थोरात कुटुंबीय-नातेवाईक भयभीत झाले असून, त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Latest Pune News)

दरम्यान, स्मशानभूमीत वास्तव्य करणार्‍या दोन व्यक्तींनी रात्री 12 वाजता दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोवर्‍या पेटवून त्यात या वस्तू टाकल्या. त्या वेळी उजेड झाल्याने आम्ही पाहिले आणि आवाज दिला असता ते दोघे पळून गेल्याचे सांगितले. घडलेला प्रकार हा निंदनीय असून, समाजात आजही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावली असून, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्याबाबत असे कृत्य केले जात असल्याने घडलेल्या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत आहे.

स्मशानभूमी परिसरात सुरक्षेची मागणी

मंचर येथील स्मशानभूमी परिसरात संरक्षण भिंत, जाळी नसल्याने कोणीही ये-जा करते. त्यामुळे स्मशानभूमीला संरक्षण भिंत, जाळी तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे मंचर नगरपंचायतीने बसवावेत, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी केली आहे.

शवदाहिनी सुरू करावी

मंचर नगरपंचायतीच्या वतीने 30 ते 40 लाख रुपये खर्च करून अंत्यविधीकरिता शवदाहिनी 2 वर्षांपूर्वी बांधली असून, अद्याप ही शवदाहिनी कार्यान्वित झाली नाही. शवदाहिनी सुरू असती तर असा प्रकार घडला नसता. त्यामुळे ही शवदाहिनी देखील नगरपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी शेवाळवाडीचे उद्योजक अमोल थोरात यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT