पुणे: भारतीय जनता पार्टीने यंदा पुणे महापालिका निवडणुकीसाठी 165 जागांपैकी 91 ठिकाणी महिलांना उमेदवारी दिली आहे. भाजपा हा अन्य कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक महिलांना उमेदवारी देणारा पक्ष ठरला आहे. महिला आरक्षण असलेल्या जागेव्यतिरिक्त नऊ सर्वसाधारण जागांवर महिलांना उमेदवारी देऊन भाजपाने नारीशक्तीवरचा विश्वास प्रकट केला आहे. अपवाद वगळता राजकीय पार्श्वभूमी व घराणेशाही नसलेल्या सर्वसामान्य युवा महिला उमेदवारांना संधी, हेही भाजपाच्या उमेदवार यादीचे वैशिष्ट्य ठरले आहे.
समाजाचा 50 टक्के घटक असणाऱ्या महिलांना 50 टक्क्यांहून अधिक जागा देत महिला सबलीकरणासाठी प्रत्यक्ष कृती करणारा पक्ष म्हणून महापालिकेच्या इतिहासात भाजपाची नोंद झाली आहे. निवेदिता एकबोटे, संगीता दांगट, अर्चना जगताप, विनया बहुलीकर, कविता वैरागे, वीणा घोष, पल्लवी जावळे, रेश्मा भोसले आणि रंजना टिळेकर या नऊ जणींना सर्वसाधारण जागेवर भाजपाने संधी दिली आहे.
पुणे महापालिकेत महिला सातत्याने निवडून आल्या आहेत. अनेक महिलांनी पुण्याचे महापौरपद भूषविले आहे. मात्र बहुतेकदा महिला आरक्षण असल्यानेच संबंधित पक्षांना महिलांना संधी द्यावी लागली होती. भाजपाने उमेदवारी यादी निश्चित करताना स्वच्छ प्रतिमा, शिक्षण, सामाजिक कार्य आणि जनहिताची कळकळ या मुद्द्यांवर महिला उमेदवारांची निवड केली.
लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘देवाभाऊ’ म्हणून राज्यातल्या महिला मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत. त्याच ‘देवाभाऊं’च्या धोरणामुळे पुण्यात भाजपाने सर्वाधिक महिला उमेदवार देण्याचा विक्रम केला. आयटी, बँकिंग, शिक्षण तसेच वैद्यकीय या प्रमुख क्षेत्रात महिलांची संख्या लक्षणीय आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचा टक्का देखील पुण्यात मोठा आहे. या पुणेकर महिलांना भाजपाचा निर्णय पसंत पडल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. महिलांच्या सहभागामुळे महापालिकेचा कारभार निश्चितच सुधारणार असल्याची प्रतिक्रिया महिला व्यक्त करत आहेत.
महिला मतदान वाढणार
राजकारण आणि प्रशासनात महिला अधिक संवेदनशीलतेने आणि पारदर्शकतेने काम करत असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. सार्वजनिक जीवनातील महिलांच्या समावेशामुळे राजकारण अधिक सुसंस्कृत होण्यास मदत होते. या पार्श्वभूमीवर भाजपाने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत चांगला पायंडा पाडला आहे. सर्वाधिक महिला उमेदवार दिल्याने मतदानाला बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या वाढणार असून, सर्वाधिक महिला उत्साहाने भाजपाला मतदान करतील, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.