उरुळी कांचन: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारूप गट रचनेवरून सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांमध्ये हवेली तालुक्यात प्रचंड कुरघोडी रंगली असून, गट व गण रचनेच्या अंतिम हरकतींवरील सुनावणी विभागीय आयुक्तांनी घेतल्यानंतरही मर्जीप्रमाणे गट रचना करण्यासाठी अधिकार्यांवर प्रचंड दबावाचा ड्रामा रंगला आहे.
तालुक्यात एकूण 62 प्राप्त हरकतींवर तब्बल 58 हरकतींना आयुक्तांनी मान्यता दिली आहे. या हरकती मान्य केल्याने प्रारूप गट रचनेत मोठा बदल झाल्याची तसेच महायुतीपूर्वीच भाजपने राष्ट्रवादीवर कडी केल्याची चर्चा तालुक्यात आहे. (Latest Pune News)
हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी 6 गट व पंचायत समिती निवडणुकीसाठी 12 गणांची 14 जुलै रोजी प्रारूप गट व गण रचना प्रसिद्ध झाली होती. 21 जुलैपर्यंत विभागीय आयुक्तांकडे झालेल्या हरकतीत 62 हरकती तालुक्यातून प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर 6 ऑगस्ट रोजी सुनावणी होण्यापूर्वीच पूर्व हवेलीत राजकीय चक्रे वेगाने फिरली असून गट व गण रचना समर्थकांच्या मर्जीनुसार व्हावी म्हणून दोन्ही सत्ताधारी पक्षांकडून जोरदार फिल्डिंग लावून नियमावली पुढे करून गट व गण रचनेत बदल करण्यात आल्याची चर्चा आहे.
संपूर्ण हवेली तालुक्याच्या गट रचनेत पश्चिम तालुक्यात एक गट वगळता पूर्व हवेलीतील गट रचना राजकीय हस्तक्षेपांनी चर्चेत आली आहे. या पाचही जिल्हा परिषदांच्या गट रचनेत सर्व गटांची रचना बदलण्यासाठी सत्ताधारी प्रमुख पक्षांनी आपले वजन वापरल्याची चर्चा आहे. या गट रचनेत हरकतीपूर्वीच विशेष बाब म्हणून मान्यता घेऊन पाचही जिल्हा परिषद गटांत मोठे बदल व राजकीय परिस्थिती पाहून गट रचना झाल्याची चर्चा तालुक्यात आहे.
आयुक्तांकडील हरकतींवर 62 पैकी 58 हरकती मान्य झाल्याने प्राधिकृत अधिकार्यांनी प्रारूप आराखडा तयार करताना झालेल्या गट रचनेत राजकीय प्रभावानेच बदल झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पूर्व हवेलीत प्रारूप आराखडा तयार करताना अधिकार्यांनी निवडणूक आयोगाचे निकष पाळले नाही की ? प्रारूप आराखड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने तालुक्यात निवडणुकीचा विषय चर्चेचा ठरला आहे. परंतु जिल्ह्यात प्रभाग रचनेत सत्ताधारी पक्षांत नसलेली स्पर्धा हवेलीत मात्र चांगलीच जोर खाऊ लागली आहे.