बीडकर म्हणाले – अल्पसंख्यकांच्या जमिनी बळकावणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही Pudhari
पुणे

Pune Jain Bording: धंगेकरांवर भाजपचा हल्ला; बीडकर म्हणाले – अल्पसंख्यकांच्या जमिनी बळकावणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही

जैन बोर्डिंगप्रकरणी मोहोळ यांच्या बचावासाठी भाजप मैदानात; धंगेकरांवर गंभीर आरोप, ‌‘आरेला कारे‌’ भूमिकेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जैन बोर्डिंगप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर विनाकारण खोटे आरोप केले जात आहे. आरोप करणाऱ्यांनीच यापूर्वी अल्पसंख्यक समाजाच्या जमिनी बळकाविल्या असल्याने त्यांना मोहोळ यांच्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. धंगेकर यांच्या प्रत्येक आरोप -प्रत्यारोपाला यापुढे त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाणार असून ‌‘आरे ला कारे‌’ अशी भाजपची भूमिका राहणार आहे, अशा कठोर शब्दात भाजपचे महापालिकेतील माजी सभागृहनेते गणेश बीडकर यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर हल्ला केला. (Latest Pune News)

जैन बोर्डिंग प्रकरणात शिंदे गटाचे आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य करत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गंभीर आरोप केले आहे. यामुळे अखेर शहर भाजप केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बचावासाठी मैदानात उतरली आहे. शनिवारी भाजपच्या पक्ष कार्यालयात गणेश बीडकर व शहराध्यक्ष धिरज घाटे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका मांडली. या वेळी पुष्कर तुळजापूरकर व पुनीत जोशी उपस्थित होते.

बीडकर म्हणाले, शहर भारतीय जनता पक्ष हा जैन समाजाच्या पूर्णपणे बाजूने आहे. जैन समाजाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच चर्चा करण्यात येईल. भाजप हा जैन समाजाच्या समर्थनार्थ आंदोलनातही सहभागी होईल. जैन समाज हा भाजपसोबतच आहे. धंगेकर यांनी वक्फ बोर्डाची रविवार पेठेतील जागा बळकाविली आहे. सुमारे शंभर कोटी रुपयांची ही जागा असून, त्यांना असे आरोप करण्याचा अधिकार नाही. धंगेकर यांच्यावर खंडणीसारखे गंभीर गुन्हे आहेत. रविवार पेठ भागातील इमारतींच्या पार्किंग आणि टेरेसवरील अधिकृत बांधकाम आणि व्यावसायिकांकडून भाडे कोण घेत आहे याचा शोध आता आम्ही घेणार आहोत.

घाटे म्हणाले, धंगेकर यांच्याकडून पहिल्यांदा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले. त्यानंतर जैन बोर्डींग प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्यावरही खोटे आरोप करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. धंगेकरांबाबत त्यांच्या पक्षातील वरिष्ठांनी देखील भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यांनी युतीधर्म पाळलेला नाही. महायुतीच्या नेत्यांनी सूचना देऊनही त्यांचे आरोप असेच सुरू राहिल्यास ‌’जशाच तसे उत्तर दिले जाईल‌’.

राज्यात महायुतीची सत्ता असून, भाजपबरोबर शिवसेना (शिंदे) पक्ष सत्तेत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी युतीधर्माचे पालन करून एकमेकांवर टीका करू नये, अशा सूचना शिवसेेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करत महानगरप्रमुख धंगेकर हे सतत भाजपच्या नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करत टीका करत आहेत. महायुतीचा धर्म म्हणून भाजपचे पदाधिकारी त्याला प्रतिउत्तर देत नव्हते. मात्र, आता हे खपवून घेतले जाणार नाही.
धीरज घाटे, भाजप शहराध्यक्ष, गणेश बिडकर, माजी सभागृह नेते, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT