पुणे: पुणे महापालिकेच्या प्रभागरचनेवर नोंदवण्यात आलेल्या हरकतींवर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी हरकतदारांनी प्रशासनापुढे नाराजी नोंदवत संताप व्यक्त केला. भाजप उमेदवारांना पोषक अशी रचना जाणीवपूर्वक तयार करण्यात आली, असा आरोप काहींनी केला, तर अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन ही रचना केल्याचा आरोप काहींनी केला. प्रभाग तयार करताना नदी, नाले, डोंगरांच्या नियमाला भाजपसाठी जाणीवपूर्वक बगल दिल्याने ही प्रभागरचना रद्द करण्याची मागणी काहींनी केली.
पुणे, महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यावरील सुनावणींची औपचारिकता शुक्रवारी पूर्ण झाली. त्यामुळे हरकतीनुसार प्रभागरचना किती बदलण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रभागरचनेवर सुमारे 5 हजार 922 हरकती दाखल झाल्या होत्या. (Latest Pune News)
गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत 828 हरकतदारांनी प्रत्यक्ष सुनावणीत सहभाग घेतला. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव व्ही. राधा यांनी सुनावणी घेतली. या वेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, एम. जे. प्रदीप चंद्रन, निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
प्रभागनिहाय आलेल्या हरकतींवर प्रामुख्याने प्रभागाच्या सीमा ठरविताना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले गेले नाही. भौगोलिक रचनेचा विचार केला गेला नाही, अशा स्वरूपाच्या हरकती जास्त होत्या. काही प्रभागांमधील एससी आरक्षण कायम राहू नये यासाठी काही भाग जाणीवपूर्वक तोडून तो दुसऱ्या प्रभागाला जोडण्यात आल्याचा देखील आक्षेप काही हरकतदारांनी नोंदवला.
दरम्यान, आयुक्त नवल किशोर राम यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत प्रभागरचना तयार करताना लोकसंख्या, प्रगणक गट आणि नैसर्गिक सीमांचा समतोल साधणे अवघड झाले. सुनावणीदरम्यान, प्रभागरचनेबाबत अनेकांचे गैरसमज असल्याचे निदर्शनास आले. वॉर्ड ऑफिसमध्ये बदल होईल असा अनेकांचा समज आहे. मात्र, तसे होणार नाही. दलित वस्तीबाबतदेखील अनेक बदल करण्यात आल्याचा आक्षेप करण्यात आला. मात्र, कोणावर अन्याय झाला असे दिसत नसल्याचे राम यांनी सांगितले.
पत्रकारांच्या प्रश्नांवर आयुक्तांची चुप्पी
प्रभागरचना कोणत्याही राजकीय दबावातून केली जाणार नाही, असा दावा आयुक्त नवल किशोर राम यांनी केला होता. मात्र, मध्य भागातील प्रभागात फारसे बदल करण्यात आले नाहीत. तसेच उपनगरातील प्रभागात मोठे बदल करण्यात आले आहेत. प्रभाग तयार करताना नद्या, नाले, डोंगर यांचादेखील विचार झाला नाही. त्यामुळे राजकीय दबावातून ही प्रभागरचना करण्यात आली का? असा प्रश्न आयुक्तांना पत्रकारांनी विचारला असता आयुक्त राम यांनी उत्तर देण्याचे टाळले.
आता लक्ष अंतिम प्रभागरचनेकडे
मागील निवडणुकीत हरकतींच्या सुनावणीनंतर सुमारे सहा टक्के बदल करून अंतिम प्रभागरचना जाहीर झाली होती. यंदाही सुनावणीची औपचारिकता पूर्ण झाल्यामुळे आता हरकतींचा अभ्यास करून प्रशासन योग्य तो निर्णय घेणार आहे. त्यानंतर अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार असून, त्याकडे नागरिक, राजकीय पक्ष आणि इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
काळ्या फिती लावून रवींद्र धंगेकरांनी केला निषेध
कसबा हा पारंपरिक प्रभाग असून, यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्याचे अस्तित्व कायम ठेवले गेले होते. मात्र यंदा नैसर्गिक नियमांचे उल्लंघन करून कसबा प्रभागाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. प्रणव रवींद्र धंगेकर यांनी ‘आपला कसबा कुठंय?’ असा फलक झळकावून गुरुवारी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी बालगंधर्वसमोर हाताला काळ्या फिती व तोंडाला काळा मास्क लावून याचा निषेध केला.
पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे हरकतदार नाराज!
गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे शुक्रवारी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येकाला तपासूनच आत सोडले जात होते. दरम्यान, काही हरकतदारांना गेटबाहेरच अडवल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली.
प्रभागरचनेविरोधात दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा संताप
या प्रभागांमधून सर्वाधिक हरकती
प्रभाग क्रमांक 34, 3, 38, 13, 15 आणि 24 या प्रभागांवर सर्वाधिक हरकती आल्या आहेत.
प्रभाग 34 (नऱ्हे-वडगाव बुद्रुक) : 2,137 हरकती; 77 हरकतदार उपस्थित.
प्रभाग 3 (विमाननगर-वाघोली) : 819 हरकती; 51 हरकतदार उपस्थित.
प्रभाग 15 : 564 हरकती; 30 हरकतदार उपस्थित.
प्रभाग 24 (कमला नेहरू हॉस्पिटल-रस्ता पेठ) : 371 हरकती; 85 हरकतदार उपस्थित.
प्रभाग 38 (कात्रज-आंबेगाव) : 200 हरकती; 76 हरकतदार उपस्थित.