BJ Medical College Pudhari
पुणे

BJ Medical College: स्वायत्ततेच्या प्रक्रियेत बी.जे. मेडिकल वगळले? राज्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

मुंबई-नागपूर महाविद्यालयांचा अभ्यासासाठी समिती; पुण्याच्या बी.जे. कॉलेजचा उल्लेखच नाही

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राज्यातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा देण्याच्या प्रक्रियेला गती देत राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबतचा आदेश काढला असून, मुंबई आणि नागपूर येथील महाविद्यालयांचा अभ्यास करून स्वायत्ततेचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवली आहे. मात्र, स्वायत्ततेसाठी सर्वप्रथम प्रस्ताव पाठवलेल्या पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव या आदेशात

नमूद करण्यात आलेले नाही.

मुंबई, पुणे आणि नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना अधिक स्वायत्तता देण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला या विषयावर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, समिती स्थापन करण्यात झालेल्या विलंबामुळे प्रक्रिया पुढे सरकत नव्हती. या वर्षी अखेर समिती स्थापन करण्यास मुहूर्त मिळाला. मात्र, आदेशामध्ये पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजचा समावेश करण्यात आलेला नाही.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबईतील ग््रॉन्ट सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (जेजे रुग्णालय) तसेच नागपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांना स्वायत्त दर्जा देण्यासंदर्भात धोरणात्मक अभ्यास करण्यासाठी समिती नेमली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, एकूण सात सदस्य या समितीत राहणार आहेत.

तीन महिन्यांत अहवाल

स्वायत्त वैद्यकीय महाविद्यालयांची प्रशासकीय रचना आणि संचालक मंडळ आणि शैक्षणिक परिषदेची मांडणी कशी असावी, अधिष्ठाता किंवा संचालकांचे अधिकार काय असावेत, आर्थिक आणि प्रशासकीय स्वातंत्र्याची चौकट कशी असावी, कर्मचारी व प्राध्यापकांच्या सेवा अटी कशा ठेवाव्यात, याबाबत समिती शिफारसी करणार आहे. संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक देखरेख आणि उत्तरदायित्वाची यंत्रणा तसेच आवश्यक कायदेबदल याबाबतही मार्गदर्शन केले जाणार असून, समितीला तीन महिन्यांच्या आत आपला अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे.

समिती काय करणार?

समिती वैद्यकीय महाविद्यालयांची विद्यमान प्रशासकीय आणि शैक्षणिक रचना, स्वायत्ततेची गरज, त्यातून होणारे संभाव्य फायदे यांचा अभ्यास करणार आहे. तसेच देश-विदेशांतील यशस्वी मॉडेलचा संदर्भ घेऊन व्यवस्थापन पद्धतीचा आढावा घेणार आहे. यामध्ये दिल्लीतील एम्स, चंदीगड येथील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था तसेच टाटा मेमोरियल केंद्र यांसारख्या संस्थांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यात येणार आहे.

दादांची उणीव जाणवतेय

पुण्यात एम्सच्या धर्तीवर रुग्णालय व्हावे, बी. जे. मेडिकल कॉलेजला स्वायत्तता मिळावी, यासाठी अजित पवार यांनी अनेकदा पाठपुरावा केला होता. मात्र, हे दोन्ही प्रस्तावित प्रकल्प अद्याप प्रलंबित आहेत. पुण्याची बाजू खमकेपणाने मांडणारे अजित पवार यांची उणीव जाणवत असल्याची चर्चाही सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT