जावेद मुलाणी
इंदापूर: दरवर्षीप्रमाणे कच्छच्या रणातून आलेल्या चित्रबलाक या सैबेरियन पक्ष्यांचे गोकूळ यंदाही इंदापूर येथे फुलले असून, हे सारंगगार पाहण्यासाठी राज्यभरातून पक्षिअभ्यासक इंदापूरला येत आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्यातून, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव, सांगली, सातारा, मुंबई परिसरातील अनेक पक्षिअभ्यासकांनी त्यासाठी इंदापूरला हजेरी लावल्याने इंदापूरची नवीन ओळख निर्माण झाली आहे. सुरुवातीस 30 ते 40 च्या संख्येने आलेले चित्रबलाक गोकूळ फुलविल्यानंतर आता 300 ते 500 झाले आहेत. त्यांच्या नयनमनोहर कवायती व हालचाली पक्षिप्रेमींना पर्वणी ठरत आहेत. (Latest pune news)
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा सरदार वीरश्री मालोजीराजे भोसले यांची इंदापूर शहरातील कसब्यात ऐतिहासिक गढी असून, गढीमध्ये सुफीसंत चाँदशाहवली बाबा दर्गाह व तुरुंग आहे. येथील तहसील कार्यालय हे नूतन इमारतीत स्थलांतरित झाले आहे. हे प्रांगण तसेच पाठीमागे असलेल्या चिंचेच्या शिल्लक राहिलेल्या केवळ दोन झाडांवर अनेक वर्षांपासून चित्रबलाक पक्षी आपले सारंगगार फुलविण्यासाठी येतात.
इंदापूर शहराशेजारी उजनी धरणाचे विस्तीर्ण पाणलोट क्षेत्र असून, सध्या धरणातील पाणीपातळी उणे असल्याने या पक्ष्यांना आवश्यक असलेले खाद्य मासे, शेवाळ हे सहज उपलब्ध होतात. डिसेंबरअखेरीस इंदापूरला येऊन हे चित्रबलाक झाडांच्या उंचावर आपली घरटी बांधतात.
जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात ते सारंगगार फुलवितात; तर मार्च, एप्रिल, मे व जून महिन्यात चित्रबलाक आपल्या बाळांना उडणे तसेच खाद्य आणायचे प्रशिक्षण देतात. लाल चोच, पांढरे शरीर असलेला हा पक्षी अत्यंत आकर्षक असून, त्याचा कसलाही त्रास मनुष्यास होत नाही; तर त्यांचे निवासस्थान असलेली गढी ही उंचावर असल्याने त्यांच्या सारंगगारास नैसर्गिक सुरक्षितता मिळते. त्यामुळे त्यांचा इंदापूर येथील अधिवास सुखदायी असतो. 8पान 3 वर
पावसाळ्याच्या सुरुवातीस जून महिन्यात पुन्हा आपल्या नवीन पिढीसह कच्छच्या रणातून सैबेरिया देशात ते परत जातात. येथील नैसर्गिक हवामानामुळे गत सात वर्षांपासून काही चित्रबलाक पक्षी येथेच कायमस्वरूपी राहू लागले आहेत.
त्यामुळे त्यांचा इंदापूरकरांना लळा लागला आहे. मुक्तछंदपणे उंच आकाशात घिरट्या घालत त्यांच्या हवेतील कसरतीमुळे या चित्रबलाक पक्ष्यांमुळे इंदापूर शहराच्या वैभवात भर पडली आहे. इंदापुरातील चिंचेच्या झाडांचे ठिकाण आता त्यांचे माहेरघरच झाले आहे.
चुकून एखादे पक्ष्याचे पिल्लू अथवा पक्षी खेले आढळले, तर स्थानिक नागरिक तत्काळ गढीवरील तुरुंगात तैनात असलेले पोलिस हे इंदापूर महाविद्यालयाचा प्राणिशास्त्र विभाग अथवा निमगाव केतकी गावातील फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या सदस्यांना बोलावून त्यावर उपचार करून त्यास आकाशात गवसणी घालण्यासाठी सज्ज करतात.
दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात थंडी वाढली की चित्रबलाक पक्ष्यांचे आगमन उजनी जलाशयाच्या पाणवठ्यानजीक होते. तेथेच त्यांचा विणीचा हंगाम पार पडतो. मग सहा महिने या पक्ष्यांच्या गजबजाटाने उजनीचा परिसर खुलून जातो. पक्ष्यांच्या विणीच्या हंगामासाठी वसवलेल्या या वसाहतीला मसारंगारफ म्हणतात.
सलग सहा महिने या सारंगाराला अनेक पक्षिमित्र, निसर्गमित्र भेट देतात. सध्या या पक्ष्यांची वीण झाली असून, त्यांची पिले उड्डाणक्षम होण्यासाठी आकाशात विहार करीत आहेत. या आकाशविहाराच्या सुंदर कवायती पाहणे हा इंदापूरवासीयांचा नित्यक्रम झाला आहे.
...असा असतो रुबाबदार चित्रबलाक
चित्रबलाक पक्ष्यास इंग्रजीत ‘पेंटेट स्टॉर्क’ असे म्हणतात तसेच त्यास ‘चाम ढोक’ किंवा ‘रंगीत करकोचा’ असेही म्हणतात. हा करकोचा जातीचा पक्षी असून, दिसायला सुंदर आहे. आकाराने साधारणपणे गिधाडाच्या आकाराचा असून, पाणथळी जागेत आढळतो.
सुमारे तीन किलो वजनाचा चित्रबलाक उभा असता. त्याची उंची 95-100 सें. मी. भरते, तर उडताना पंखांच्या बाजूने लांबी 150-160 सें. मी. भरते. याची चोच पिवळ्या रंगाची, टोकाकडे किंचित बाकदार, मोठी आणि लांब असून, याचा चेहरा मेणासारखा पिवळा, त्यावर पिसांचा अभाव, उर्वरित सर्वांगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून, छातीवर आडवा काळा पट्टा असतो. चित्रबलाक नर-मादी दिसायला सारखेच असतात. पक्ष्याचे पिल्लू राखाडी असते, चोच काजळी असते, काही कालावधीनंतर त्यांना सुंदर रंग चढतो. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये चित्रबलाक रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.