Bird Alopecia Research Pudhari
पुणे

Bird Alopecia Research: माणसांप्रमाणे पक्ष्यांनाही टक्कल; पुणे-पिंपरीतील तिघा पक्ष्यांची राष्ट्रीय स्तरावर पहिली नोंद!

साळुंकी, कोकिळ आणि कावळा पिसेविरहित; हा ‘मॉल्टिंग’चा प्रकार नाही, तर बुरशीजन्य आजार? पक्षीअभ्यासकांचा महत्त्वाचा शोध.

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कंबळे

पिंपरी : व्यक्तींना वयोमानानुसार टक्कल पडते. तर काही अपवादात्मक स्थितीत एखादा आजार किंवा अनुवांशिकतेमुळे टक्कल पडते; मात्र पक्ष्यांनादेखील टक्कल पडते, असे सांगितले तर आश्चर्यच वाटेल ना ! होय, हे खरे आहे. पक्ष्यांना टक्कल पडल्याविषयी ‌‘न्यूजलेटर फॉर बर्डवॉचर्स‌’ या पक्षी विज्ञान पत्रिकेत अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे पक्षीअभ्यासक उमेश वाघेला आणि राजेंद्र कांबळे यांचा शोधनिबंध नुकताच प्रकाशित झाला आहे.

पक्षीअभ्यासक उमेश वाघेला आणि राजेंद्र कांबळे यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील तीन वेगवेगळ्या भारतीय पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये टक्कल पडल्याची असामान्य निरीक्षणे नोंदवली आहेत. हा शोधनिबंध राष्ट्रीय स्तरावरील पक्षीविज्ञान पत्रिकेत प्रकाशित झाला आहे. जून 2011 मध्ये चिंचवडगाव येथे टक्कल पडलेल्या साळुंकीचे निरीक्षण करण्यात आले होते. संपूर्ण डोके, गळा ते खांद्यापर्यंत हा पक्षी पूर्णपणे पिसेविहीन होता. साळुंकीच्या गळ्याच्या उघड्या पिवळ्या त्वचेवर बुरशीची वाढ किंवा परजीवी आढळून आले होते.

टक्कल पडलेला कोकिळ फेबुवारी 2022 मध्ये निगडी येथे रेस्क्यू करताना आढळला होता. कोकिळच्या चोचीपासून डोळ्याच्या मागेपर्यंत डोक्यावर पिसांचा पूर्ण अभाव होता. ऑक्टोबर 2023 मध्ये औंध येथे पूर्णपणे टक्कल पडलेला कावळा आढळला होता. त्याच्या डोक्यावर आणि मानेवर खांद्यापर्यंत पिसे नव्हती, ज्यामुळे त्याची काळ्या रंगाची त्वचा उघडी पडलेली होती. विशेष म्हणजे या वेगवेगळ्या तिन्ही प्रजातींचे पक्षी पूर्ण वयस्क होते.

वाघेला म्हणाले की, माणसांसारखे पक्ष्यांना वयानुसार टक्कल पडत नसते. मात्र, काही पक्ष्यांमधे विणीच्या काळात किंवा त्या आधी ‌‘मॉल्टिंग‌’ म्हणजे शरीरावरची संपूर्ण किंवा ठराविक भागात पिसे गळती होते. ही प्रक्रिया नैसर्गिक, अल्पावधीसाठी असते. मात्र साळुंकी, कावळा आणि कोकिळ या पक्ष्यांमध्ये मॉल्टिंगची प्रक्रिया होत नसते. कोकिळ आणि कावळा हे दोन्ही त्यांच्या प्रजनन न होण्याच्या हंगामात दिसले असल्याने, डोक्यावरची पिसे गळण्यात इतर घटकांचादेखील वाटा असू शकतो. या प्रजातींमध्ये डोक्यावरची पिसे गळणे हे नैसर्गिक नसून एखादा आजार किंवा संसर्ग झाल्यामुळे होते.

टक्कल पडण्याचा संबंध बुरशीजन्य वाढ, त्वचेचा रोग किंवा एक्टोपारासाइट्‌‍सशी असू शकतो. पिसे गळण्याचे हे संभाव्य कारण असू शकते. यासाठी आणखी संशोधनाची आवश्यकता आहे. साळुंकी आणि पोपट यांना टक्कल पडल्याची भारतातील काही ठिकाणी नोंद या आधी झाली असली तरी टक्कल पडलेला कोकिळ आणि कावळा यांची राष्ट्रीय स्तरावर ही पहिलीच नोंद आहे.

शोधनिबंधात ज्ञानप्रबोधिनी विद्यालयातील शिक्षक प्रमोद सादुल यांचे सहकार्य लाभले. पक्षीनिरीक्षण करताना पक्ष्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांच्या आरोग्याच्या समस्या किंवा त्यांच्या पंखांच्या नुकसानास कारणीभूत असलेली बदलती पर्यावरणीय कारणे शोधता येतील. पंखगळतीचे या नोंदी सूचित करतात की शहरी पक्ष्यांच्या संख्येत टक्कल पडण्याच्या नेमक्या कारणांचा अभ्यास करण्याची सखोल संशोधनाची आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT