पुणे

बड्या महापालिकेचा कचराही चाकणला?

अमृता चौगुले

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  चाकण परिसरात दररोज शेकडो मेट्रिक टन कचरा तयार होत असून, हा कचरा सध्या आंबेठाण रस्त्यावरील खराबवाडी (ता. खेड) हद्दीतील खाणीत टाकण्यात येत आहे. वाढत्या शहरीकरणाने कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत असताना याच ठिकाणी लगतच्या खेड तालुक्याजवळील काही बड्या महापालिकेच्या हद्दीतील कचरादेखील बेकायदेशीरपणे आणून टाकला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या ठिकाणी खेड तालुक्याबाहेरील भागातून रात्रीच्या वेळी मोठे डंपर भरून अत्यंत धोकादायक आणि वैद्यकीय कचरा आणून टाकला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. बिरदवडी भागातील कार्यकर्त्यांनी यातील काही वाहने पकडून थेट पोलिसांना कळविले. मात्र, हा प्रश्न आमच्या कक्षेत नसल्याचे सांगत महाळुंगे पोलिसांनी कानावर हात ठेवले. त्यामुळे रात्रीच्या वेळी या भागात कचरा आणून टाकणार्‍या काही मंडळींचे चांगलेच फावले आहे.

संतप्त झालेल्या चाकण आणि परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कचरा डेपोची पाहणी केली. बाहेरून कचरा आणून या भागात टाकणार्‍या मंडळींवर कारवाई करण्याची मागणी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड येथील काही ठेकेदार रात्रीच्या वेळी या भागात मोठ्या प्रमाणावर कचरा आणून जाळत असल्याचा आरोप भाजपचे कालिदास वाडेकर, चाकण विकास मंचचे कुमार गोरे, काँग्रेसचे नीलेश कड, बिरदवडीचे सरपंच दत्तात्रेय गोतारणे व ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत स्थानिक स्वराज्य संस्थांची बैठक घेऊन याकडे लक्ष वेधल्याचे मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी सांगितले आहे.

त्यामुळे वाढला प्रदूषणाचा धोका
गेल्या बारा-पंधरा वर्षांत चाकण व औद्योगिक परिसरातील कचर्‍याचे प्रमाण कित्येक पटीने वाढले आहे. चाकण-आंबेठाण रस्त्यावर खराबवाडी (ता. खेड) हद्दीतील दगड खाणीत गेल्या अनेक वर्षांपासून चाकण नगरपरिषदेसह लगतच्या भागातूनही येथे कचरा टाकण्यात येत आहे. आजपर्यंत घनकचरा प्रकल्पच सुरू होऊ न शकल्यामुळे लाखो टन कचरा या अघोषित डम्पिंग यार्डवर पडून राहतो. काही दिवसांनंतर कसलीही प्रक्रिया न करता हा कचरा पेटवून दिला जातो. या कचर्‍यामुळे प्रदूषणाचा धोका वाढल्याचे बिरदवडी ग्रामस्थांनी या वेळी सांगितले.

20 वर्षे अशीच स्थिती
चाकणमधील कचरा समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी चाकण नगरपरिषदेने मागील काही वर्षांपासून प्रयत्न चालविले आहेत. घनकचरा प्रकल्पासाठी जागा प्रशासनाकडून पदरात पाडून घेण्यासाठी नगरपरिषद धडपड करीत आहे. मात्र, अद्याप याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. सध्या खराबवाडी येथील खाणीत कचरा कुठल्याही प्रक्रियेविना एकाच ठिकाणी फेकला जातो. नंतर त्याला आग लावून दिली जात असल्याची स्थिती मागील 15 ते 20 वर्षांत पाहावयास मिळत आहे.

 हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT