भूगावमधील वाहतूक कोंडी नऊ महिन्यांत सुटणार; बाह्यवळण मार्गासाठी एफएसआय, टीडीआर File Photo
पुणे

Traffic Issue: भूगावमधील वाहतूक कोंडी नऊ महिन्यांत सुटणार; बाह्यवळण मार्गासाठी एफएसआय, टीडीआर

चांदणी चौक ते भूगाव भागातील वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची सुटका होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

पिरंगुट: पुणे-कोलाड राष्ट्रीय महामार्गावरील भूगाव बाह्यवळण रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. आता या प्रकल्पाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. पुढील नऊ महिन्यांत या बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिले. त्यामुळे चांदणी चौक ते भूगाव भागातील वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची सुटका होणार आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या वेळी त्यांनी प्रलंबित आणि निर्धारित रस्ते विकास कामांचा आढावा घेतला. या वेळी प्रलंबित असलेल्या भूगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामाबाबत त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. (Latest Pune News)

एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम म्हणाले, ‌‘भूगाव बाह्यवळण रस्ता भूगाव ते परांजपे स्कीमकडे जाऊन 200 मीटर डावीकडे वळून मुख्य रस्त्यापर्यंत जाईल. या रस्त्याची एकूण लांबी 860 मीटर असून, रुंदी 18 मीटर असेल. हा चार पदरी रस्ता असून, तो राष्ट्रीय महामार्ग (एनएच 753 एफ) जोडला जाईल.‌’

‌’या कामासाठी मोहनलाल मतरानी कन्स्ट्रक्शन या कंपनीला 15 कोटी 30 लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. पावसाळ्यामुळे काम सुरू करण्यास विलंब होत असून, एका महिन्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्यापूर्वी मंजुरी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. सुमारे नऊ महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे,‌’ असेही कदम यांनी सांगितले.

भूगाव गावठाणातील रस्ता रुंद करण्यास मर्यादा असल्याने स्थानिकांसह प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील स्थानिकांनी बाह्यवळण रस्त्याची मागणी केली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनीही गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार एनएचएआय आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्याकडून या प्रकल्पाला गती देण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे हा रस्ता रायगडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करेल, ज्यामुळे भूगाव गावातील प्रवास सुकर होईल.

जमिनींचा आगाऊ ताबा

या प्रकल्पासाठी एकूण 1.67 हेक्टर जमिनीचे भूसंपादन अपेक्षित असताना 1.55 हेक्टर (95 टक्के) जमिनीचे भूसंपादन पीएमआरडीएने केले आहे. प्रकल्पातील 41 बाधितांपैकी 37 जणांनी पीएमआरडीएला भूसंपादनासाठी सहमती दर्शविली आहे. त्यानुसार भूसंपादनासाठी बाधितांना चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) आणि हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर) यासारखे मोबदले देऊन जमिनींचा आगाऊ ताबा घेण्यात आला आहे, असेही कदम यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात प्रकल्प

लांबी : 860 मीटर, रुंदी : 18 मीटर

प्रकार : चारपदरी रस्ता

जोडणी : राष्ट्रीय महामार्ग (एनएच-753 एफ)

कंत्राटी खर्च : 15 कोटी 30 लाख रुपये

प्रत्यक्ष कामाला सुरुवात : पावसाळ्यानंतर

पूर्णत्वाची मुदत : 9 महिन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT