TDR Scam Pudhari
पुणे

TDR Scam: जादा टीडीआर मिळविण्यासाठी दुपटीने वाढविली झोपड्यांची संख्या; भोसरीतील गवळी माथा एसआरए प्रकल्पात सावळा गोंधळ

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने ऐनवेळी मूळ प्रस्तावात फेरफार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: झोपड्यांची संख्या वाढवली की, टीडीआर वाढणार, या उद्देशाने भोसरीतील गवळी माथा येथील सर्व्हे नंबर ६५३ वर राबविण्यात आलेला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील झोपड्यांची संख्या ऐनवेळी वाढविण्यात आली आहे.

झोपड्यांच्या पूर्वीच्या संख्येत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे.

यामुळे संबंधित विकसकाला पूर्वीच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक टीडीआर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गवळी माथा येथील हा एस.आर.ए. प्रकल्प पूर्वीपासून सन २०२४ पर्यंत गोयलगंगा प्रमोटर्स या कंपनीच्या वतीने राबविण्यात येत होता.

मात्र, याच प्रकल्पात सन २०२४ मध्ये अतुल गोयल, बाळासाहेब लांडगे, झिशान सय्यद हे नवीन भागीदार वाढले. त्यानंतर या सर्वांनी मिळून हेरंब इन्फ्रा एलएलपी या कंपनीच्या नावाने पुन्हा एकदा दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रस्ताव दाखल केला. या नवीन प्रस्तावात झोपड्यांची संख्या १ हजार २९८ इतकी दाखविण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार झोपड्यांची संख्या ६५० इतकी होती. यावरून पूर्वीच्या तुलनेत झोपड्यांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाल्याचे उघड झाले आहे. या योजनेत फेरफार करून झोपडपट्टीधारकांपेक्षा विकसकांच्याच फायद्याचे निर्णय घेण्यात आल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

झोपड्यांची संख्या अचानक कशी वाढली?

मुळात आधी हा प्रकल्प १४ वर्षे प्रलंबित राहिला. त्यानंतर या प्रकल्पाच्या मूळ प्रस्तावात बदल का करण्यात आले? बदल करण्यात आल्यानंतर झोपड्यांची संख्या दुपटीने वाढली. मग जागा तीच, प्रस्ताव तोच, विकसक तोच (केवळ काही भागीदार वाढवले), तरीही झोपड्यांची संख्या अचानक कशी वाढली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘तो’ अधिकारी कोण?

एसआरएचे तत्कालीन सीईओ नीलेश गटणे यांच्या कार्यकाळातच या प्रस्तावावर प्रक्रिया झाली. या योजनेच्या मूळ प्रस्तावात बदल, झोपड्यांच्या संख्येत वाढ आणि नवीन भागीदारांची वाढ करण्याचे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प विभागातील एसआरएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संगनमताने केले आहे.

यामुळे नेमका 'तो' वरिष्ठ अधिकारी कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या गैरकारभाराची चौकशी झाल्यास या अधिकार्याचा कारनाम्यांचा पर्दाफाश होऊ शकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT