माणिक पवार
पुणे: भोंगवली सबस्टेशन व ७६५ केव्ही क्षमतेच्या टाँवर लाईनच्या कामामुळे भोर तालुक्यातील ७१ व राजगड तालुकयातील ४५ अशी ११६ गावे बाधित होत असल्याने पुणे सातारा महामार्गावर जनसागर मोठा उसळला आहे. यामुळे सपूर्ण पुणे सातारा महामार्ग मेगाब्लॉक झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अजून दोन तास आंदोलन सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
भोर व राजगड तालुका सबस्टेशन व -टाँवरलाईन हटाव संघर्ष समितीच्या वतीने आज रविवारी पुणे सातारा महामार्गावर कापूरहोळ चौक ( ता. भोर ) येथे सकाळी दहा वाजल्यापासून सुरू असलेले रास्ता रोको आंदोलन अद्याप सुरूच आहे. यासाठी आंदोलना ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तोडफोड व अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे सातारा महामार्गावर पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड शिवापूर, टोलनाका, कामथडी इतर जागोजागी वाहने पोलिसांनी रोखली आहे.
रोको आंदोलनात सर्वच पक्षातील राजकी मान्यवर व मोठ्या संख्येने भोर आणि राजगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे बैलगाडी, ट्रॅक्टर व इतर वाहनासह रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. सबस्टेशन, -टाँवरलाईन हटवा तसेच भोंगवली जाळपोळ प्रकरणातील खोटे गुन्हे मागे घेऊन अटक असलेल्या चार शेतकऱ्यांना तुरुंगातून तातडीने सोडावे या प्रमुख मागण्या करत अजूनही शेतकऱ्यांनी ठिय्या कायम मांडला आहे.
सध्या घटनास्थळी महसूलचे अधिकारी, पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल हे आंदोलकाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नसल्चाचा शेतकऱ्यांनी पवित्रा घेतला आहे.
या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार संग्राम थोपटे, जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, रणजीत शिवतरे, पोपटराव सुके, चंद्रकांत बाठे, कुलदीप कोंडे, दिनकर धरपाळे, विशाल कोंडे, तृप्ती खुटवड, अमोल पांगारे, रोहन बाठे, गणेश खुटवड यांच्यासह हजारो नागरिक रस्त्यावर ठाण मांडले आहे.