भोर : भोर पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाले आहे. यामुळे अनेक इच्छुक नेत्यांच्या आकांक्षांवर पाणी पडले आहे तर महिला नेतृत्वाला नवी संधी प्राप्त झाली आहे.(Latest Pune News)
भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, राजगड आणि मुळशी या तिन्ही पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी महिला आरक्षण जाहीर झाले आहे. पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत 13 पंचायत समित्यांच्या सभापतिपदांची आरक्षण सोडत गुरुवारी (दि. 9) रोजी जाहीर झाली. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भोर पंचायत समितीमध्ये महिलांनी स्थानिक पातळीवर सक्रिय सहभाग घेतला होता. या वेळी सभापतिपदासाठी मिळालेले आरक्षण महिलांना निर्णय प्रक्रियेत अधिक सहभागी होण्याची संधी देणार आहे.
यामुळे ग्राॉमीण भागातील विकासाला गती मिळेल तसेच महिला नेतृत्व अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाच्या महिला सक्षमीकरण उपक्रमांना चालना मिळण्याबरोबरच युवा महिलांना सार्वजनिक जीवनात पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळेल. असे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. सन 2017 मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल बोडके सभापती झाल्या होत्या.
त्यानंतर राजकीय घडामोडींनंतर दमयंती जाधव यांनी सभापतिपदाची जबाबदारी सांभाळली. यापूर्वी जनाबाई भेलके, हेमलता बांदल, नंदा शेडगे, सुनीता बाठे, मंगल बोडके आणि दमयंती जाधव यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. महिला सभापतींच्या नेतृत्वाखाली भोर पंचायत समितीने यापूर्वी अनेक विकासकामांना गती दिली आहे. यंदाच्या आरक्षणामुळे ग्रामीण भागातील महिलांना नेतृत्वाची नवी संधी मिळणार असून याचा फायदा विकासाला होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
यंदा भोर पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत वेळू, नसरापूर, कामथडी, भोंगवली, शिंद, भोलावडे, उत्रौली, कारी याप्रमाणे भोर पंचायत समितीचे प्रभाग, गणाची रचना तयार झाली आहे. सोमवारी (दि. 13) सदस्य पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय रणसंग्राम सुरू होणार आहे.