Bhor Panchayat Samiti  Pudhari
पुणे

Bhor Panchayat Samiti Chairman Election: भोर पंचायत समिती सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष

भाजप-राष्ट्रवादीचे समान संख्याबळ; चिठ्ठीद्वारे निर्णयाची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

भोर: भोर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदाची निवड सोमवारी (दि. 9) सकाळी 11 वाजता होणार आहे. तब्बल 9 वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेासचे प्रत्येकी चार सदस्य विजयी केल्याने दोन्ही पक्षांचे समान संख्याबळ झाले आहे. परिणामी सभापती, उपसभापती कोणाचा होणार? याकडे संपूर्ण भोर तालुक्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे. आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग््रााम थोपटे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

भोर पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी सकाळी 11 ते 11.30 पर्यंत सभापती व उपसभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारून सकाळी 11.31 ते 12 वाजेपर्यंत अर्जांची छाननी होऊन दुपारी 12.01 ते 12.30 उमेदवारी अर्ज मागे घेणे, नंतर दुपारी 12.31 पासून आवश्यक असल्यास मतदान घेईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात हे पीठासीन अधिकारी असणार आहेत.

सभापतिपदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्यास ईश्वरचिठ्ठीद्वारे सभापती निवडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभापतिपद कोणत्या पक्षाच्या पारड्यात पडणार, समान मतदान झाल्यावर कोणाची चिठ्ठी निघणार की काही वेगळी खेळी होते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

भोरचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी आहे. आठ सदस्यांपैकी चार महिलांच्या जागेवर तीन सर्वसाधारण व एक ओबीसी आरक्षणातून महिला निवडून आल्या आहेत. यात राष्ट्रवादीच्या दोन आणि भाजपच्या दोन महिला सदस्या निवडून आल्या आहेत. इतर चार ठिकाणी निवडून आलेल्या पुरुषांमध्ये दोन राष्ट्रवादी व दोन भाजपचे सदस्य आहेत.

निवडून आलेल्या महिला सदस्या तृप्ती खुटवड आणि गीता आंबवले ह्या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. मनाषा कंक व सुषमा चव्हाण ह्या प्रथमच निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या. यातील आंबवले या ओबीसी महिला आरक्षण गणातून, तर इतर तीनही सदस्या सर्वसाधारण महिला आरक्षणाच्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

या चार महिला सदस्यांपैकी एका सदस्याची सभापतिपदी निवड होणार आहे. त्यामुळे पक्ष कोणाला संधी देणार आणि त्यातून कोणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडते, हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र, सभापती निवडीबाबतच्या झालेल्या पेचाबाबत तालुक्यात चर्चा आहे. नुकत्याच भोर नगरपरिषद नगरसेवकपदाच्या निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे विजयी उमेदवार निवडण्यात आला होता.

समान मते पडल्यास चिठ्ठी

प्रथमतः सभापतिपदासाठी निवडणूक घेतली जाईल. या निवडणुकीतील उमेदवारांना समान मते पडल्यास ईश्वरचिठ्ठीद्वारे सभापतिपदाची निवड केली जाईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT