Dam  Pudhari
पुणे

Bhatghar Dam Water Level: भाटघर व निरा देवघर धरणांत 37 टक्के पाणीसाठा; गतवर्षापेक्षा मोठी वाढ

समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा; उन्हाळ्यात पाणीटंचाईची चिंता कमी

पुढारी वृत्तसेवा

भोर: भोर तालुक्यातील भाटघर व निरा देवघर धरणात गतवर्षापेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध असून, दोन्ही धरणांत 37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सद्य:स्थितीला भाटघर धरणात 37.80 टक्के, तर निरा देवघर धरणात 37.05 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

गतवर्षी 24 एप्रिलला भाटघरमध्ये 20.57 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, तर निरा देवघर धरणामध्ये 21.07 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. म्हणजे, भाटघर धरणात गतवर्षापेक्षा दीडपटीपेक्षा जास्त, तर निरा देवघर धरणात गतवर्षापेक्षा दुपटीपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

भाटघर धरणाची पाणी साठवणक्षमता 23.75 टीएमसी एवढी आहे, तर निरा देवघर धरणाची पाणी साठवणक्षमता 12 टीएमसी एवढी आहे. यावर्षी भोर तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक काळ म्हणजे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ पाऊस झाला. यामुळे दोन्ही धरणे पूर्णक्षमतेने भरलेली दिसून येत होती.

भाटघर धरण वेळवंडी नदीवर बांधलेले आहे, तर निरा देवघर धरण निरा नदीवर आहे. निरा नदीचे पाणी पुढे वाहिल्यानंतर भाटघर जलविद्युत केंद्रापासून थोड्याशा अंतरावर वेळवंडी नदी व निरा नदी यांचा संगम होतो. यामुळे शेजारील गावाला संगमनेर हे नाव पडले आहे.

निरा नदी व वेळवंडी नदीचा संगम झाल्यानंतर निरा नदी काही किलोमीटर वाहिल्यानंतर वीर धरणात समाविष्ट होते. वीर धरणापासून उजवा कालवा व डावा कालव्यातून पूर्वेकडील शेतकऱ्यांना शेतीसिंचनासाठी पाणीपुरवठा होतो. 1 मार्चपासून निरा डावा कालव्यातून 3.77 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला, तर उजवा कालव्यातून 6.57 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला.

यावर्षी धरणात गतवर्षापेक्षा पाण्याची स्थिती समाधानकारक असल्याने उन्हाळ्यात पूर्वेकडील शेतकऱ्यांची पिकांच्या शेतीसिंचनासाठी चिंता मिटण्याची शक्यता आहे. यामुळे रब्बी व बागायत पिकांसाठी शेतकरीवर्ग समाधान व्यक्त करीत आहे. यावर्षीपेक्षा गतवर्षी धरणातील पाणीसाठा कमी होता. यामुळे शेतकरीवर्गाला संकटाशी सामना करावा लागला होता.

गतवर्षापेक्षा जास्त पाणीसाठा

भाटघर, निरा देवघर, गुंजवणी या तीन धरणांचे पाणी वीर धरणाला मिळते. सद्य:स्थितीला भाटघर धरणात 37.80, निरा देवघर 37.05 टक्के, तर गुंजवणी धरणात 32.55 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच, वीर धरणात 49.16 टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. यावर्षी गतवर्षापेक्षा धरणक्षेत्रात जास्त पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT