Bhongavali Power Project Fire Pudhari
पुणे

Bhongavali Power Project Fire: भोंगवलीतील हाय व्होल्टेज वीज प्रकल्पाच्या कार्यालयाला भीषण आग; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तपासाला वेग

वाहने, यंत्रसामग्री आणि साहित्य जळून खाक; अपघात की घातपात? पोलिस तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

सारोळा: भोर तालुक्यातील भोंगवली येथे तीव्र वादाच्या भोवऱ्यात असलेल्या प्रस्तावित हाय व्होल्टेज वीज प्रकल्पाला शुक्रवारी (दि. ३१ जुलै) पहाटे भीषण आग लागून कार्यालय, चारचाकी वाहने, जेसीबी, डंपर, जनरेटर व अन्य साहित्य जळून खाक झाले. या घटनेनंतर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, आगीमागील नेमके कारण अद्यापही गूढ आहे.

या प्रकल्पाला भोंगवलीसह बाधित ७१ गावांतील ग्रामस्थांचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे. गावालगत प्रकल्प उभारल्यास आरोग्यविषयक व पर्यावरणीय धोके निर्माण होतील, असा दावा करत ग्रामसभा, आंदोलन, बैठका, तसेच 'प्रकल्प हटाव कृती समिती'च्या माध्यमातून विरोध करण्यात आला होता.

दरम्यान, आगीनंतर राजगड पोलिस, महसूल प्रशासन आणि एसआरपीएफ घटनास्थळी दाखल झाले. चौकशीसाठी काही ग्रामस्थांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न होताच महिलांनी तीव्र विरोध केला. पोलिसांनी चौकशीसाठी एका तरुणाला ताब्यात घेतले असून, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघात की घातपात, याचा तपास सुरू आहे.

घटनास्थळी माजी आमदार संग्राम थोपटे, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलिस निरीक्षक संतोष जाधव आदींनी भेट दिली. येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कडेकोट बंदोबस्तातही आग कशी?

प्रकल्प परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही कार्यालय, वाहने आणि यंत्रसामग्री जळून खाक झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आगीमागे नेमके काय कारण आहे, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

'आंदोलन बदनाम करण्याचा डाव'

प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी या घटनेमागे आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. आगीच्या घटनेचा निष्पक्ष तपास करून सत्य बाहेर आणण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT