पुणे: श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील महादेव मंदिर दर्शनासाठी बंद असतानाही खासदार निशिकांत दुबे यांना मंदिरात दर्शन देण्याचा निर्णय कोणी घेतला? तसेच त्यांना व्हीआयपी सुविधा कोणी उपलब्ध करून दिल्या? याची चौकशी करण्यात येईल आणि यासंदर्भात लवकरच खुलासा करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर मागील दोन ते तीन महिन्यांपासून भाविकांसाठी बंद आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर काही काळासाठी मंदिर खुले करण्याबाबत चर्चा झाली होती; मात्र संभाव्य गर्दी लक्षात घेता तो निर्णयही रद्द करण्यात आला. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार उपस्थित असतानाही पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय पूजा केली. असे असतानाच महाराष्ट्राविषयी वादग््रास्त वक्तव्य करणारे खासदार निशिकांत दुबे यांना व्हीआयपी सुविधा देत मंदिरात दर्शनाची परवानगी देण्यात आली. त्यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्याची परवानगी कोणी दिली.
त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था कोणी केली आणि एका खासदाराला इतकी विशेष वागणूक कोणी दिली, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी अहिर यांनी केली. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले की, मराठी माणसाविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात शिवसेनेची भूमिका नेहमीच ठाम राहिली आहे आणि अशा वक्तव्यांचा आम्ही निषेध केला आहे. भीमाशंकर मंदिर बंद असताना खासदार दुबे यांना व्हीआयपी सुविधा देऊन दर्शन घडविण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला? याची चौकशी करून याबाबतचा सविस्तर खुलासा केला जाईल.