मंचर: श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मंदिर विकासकामांमुळे बंद असल्याने भाविक व पर्यटकांची वर्दळ थांबली आहे. त्याचा थेट फटका करवंद विक्री करणाऱ्या आदिवासी शाळकरी मुलांना बसत आहे.
मे महिन्याच्या सुट्या सुरू होताच आहुपे, तळेघर, श्री भीमाशंकर परिसरातील डोंगरदऱ्यांमध्ये करवंद तोडणीला वेग येतो. पहाटेपासून लहान मुले जंगलात जाऊन करवंदे गोळा करतात. त्यानंतर पळसाच्या पानांच्या द्रोणात भरून ती भीमाशंकर मार्गावरील रस्ते, बसस्थानके व पर्यटनस्थळी विक्रीसाठी बसतात.
दरवर्षी भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे या मुलांची चांगली कमाई होत असते. मिळालेल्या पैशातून शालेय साहित्य, कपडे तसेच घरखर्चासाठी मदत केली जाते. मात्र, यंदा मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे मंदिर बंद असल्याने भाविकांची संख्या घटली आहे. परिणामी करवंद विक्री ठप्प झाली असून, मुलांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत आहे.
करवंद घ्या... गोड करवंद घ्या... अशी हाक देणारी ही मुले आता तासन् तास ग््रााहकांच्या प्रतीक्षेत बसलेली दिसत आहेत. स्थानिक ग््राामस्थांनी प्रशासनाने विकासकामांसोबत पर्यटकांची ये-जा सुरळीत ठेवावी, अशी मागणी केली आहे.
दरवर्षी मे महिन्यात करवंद विक्रीतून मुलांना चांगला पैसा मिळतो. यंदा मंदिर बंद असल्याने पर्यटकच नाहीत. मुलांची करवंदे तशीच पडून राहत असून, त्यांच्या शिक्षण खर्चावरही परिणाम होत आहे.गणेशभाऊ कोकणे, उद्योजक महाळुंगे-सुपेधर