मंचर: श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर येथील सुरू असलेल्या विकासकामांमुळे मंदिर बंद ठेवण्याचा कालावधी वाढविण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधी 3 महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता कामे अपूर्ण असल्यामुळे पावणेदोन महिने मुदतवाढ देत 31 मेपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी किमान मुखदर्शन सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे होणारी गर्दी, भाविकांची सुरक्षितता तसेच जून महिन्यातील संभाव्य पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन 9 जानेवारी ते 9 एप्रिल या कालावधीत मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र, विकासकामे अद्याप पूर्ण न झाल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंदिर 31 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सूर्यकांत कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सभामंडपाचे सुमारे 75 टक्के काम पूर्ण झाले असून, घुमटाचे काम सुरू आहे. तसेच मंदिराकडे जाणाऱ्या पायरीमार्गाचे कामही प्रगतीपथावर असल्याने सध्या भाविकांसाठी प्रवेशमार्ग बंद ठेविण्यात आला आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाळा सुरू होण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मंदिर बंद राहण्याच्या निर्णयामुळे स्थानिक हॉटेल व लॉजिंग व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. देशभरातील भाविकांनी आधीच बुकिंग केले होते; मात्र कालावधी वाढल्याने आरक्षणे रद्द करावी लागली.
मंदिरातील सभामंडप व दर्शन रांगेचे काम पूर्ण होईपर्यंत किमान मुखदर्शनाची सुविधा सुरू करावी, अशी मागणी कायदेशीर सल्लागार सूर्यकांत बाबा धायबर, भीमाशंकर हॉटेल अँड रिसॉर्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण बांगर, उपाध्यक्ष अशोक लोहकरे, सचिव बाबाजी निघोट, सदस्य संतोष बोऱ्हाडे, कमलेश वळसे पाटील यांच्यासह हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.