मंचर: संतोष वळसे पाटील
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील प्राचीन ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकास कामांसाठी आगामी तीन महिने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याचे विविध परिणाम भाविकांसह स्थानिक नागरिकांवर होणार आहेत. ऑनलाइन दर्शन उपलब्ध करून देण्याची भाविकांनी मागणी केली आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू होणाऱ्या संरचनात्मक दुरुस्ती, सुरक्षाव्यवस्था बळकटीकरण, दर्शन रांग व्यवस्था, स्वच्छता व पायाभूत सुविधांच्या कामांसाठी हा कालावधी आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.मात्र मंदिर बंद ठेवल्यामुळे लाखो भाविकांना दर्शनापासून वंचित रहावे लागणार असून विशेषतः महाशिवरात्री, श्रावण महिना व शनिवार-रविवारच्या गर्दीवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात.मंदिर बंद राहिल्यास त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. यासोबतच स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, फेरीवाले, वाहनचालक यांचे अर्थकारण पूर्णपणे दर्शनावर अवलंबून असल्याने तीन महिने व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन या यात्रेवर अवलंबून आहे.
दरम्यान, विकास कामे आवश्यक असली तरी भाविकांसाठी पर्यायी दर्शन व्यवस्था, ऑनलाईन दर्शन किंवा ठराविक वेळेत दर्शन खुले ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिक व भाविकांकडून होत आहे.प्रशासनाने याबाबत लवकरच स्पष्ट निर्णय जाहीर करावा,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.