Bhimashankar Temple Pudhari
पुणे

Bhimashankar Devotees: भीमाशंकरला भाविकांचा अथांग जनसागर; तीन दिवसांत ७ लाख भाविकांचे दर्शन

श्रावणी सोमवार, नागपंचमीनिमित्त २ किलोमीटरपर्यंत दर्शनरांग; संततधार पावसातही ‘हर हर महादेव’चा जयघोष

पुढारी वृत्तसेवा

भीमाशंकर: पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचे औचित्य साधण्यासाठी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांचा अथांग जनसागर लोटला होता. शनिवार, रविवार जोडून आलेली सुट्टी आणि श्रावणी सोमवार या तीन दिवसांत सुमारे ७ लाख भाविकांनी 'हर हर महादेव'च्या जयघोषात पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले.

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी मुख्य मंदिरापासून तब्बल २ किलोमीटरपर्यंत भाविकांची रांग लागली होती. संततधार पाऊस व धुके असूनही मोठ्या संख्येने भाविक येथे आले होते. गर्दी नियंत्रित करताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत होती. वाहनतळापासून ते बसस्थानकापर्यंत भाविकांना पोहचवण्यासाठी एसटी महामंडळाच्या ३७ बससह खासगी सुमारे १०० युको वाहनांची मदत घेतली जात होती.

श्रावण यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे देशभरातून भाविक येत असतात. त्यामुळे भीमाशंकर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याची आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची जोरदार मागणी भाविकांनी केली आहे.

भर पावसातही उत्साह

भीमाशंकर येथे संततधार पावसातही दर्शनासाठी भाविकांमध्ये अमाप उत्साह दिसून येत होता. महादेवाच्या दर्शनाबरोबरच भाविक गुप्त भीमाशंकर, साक्षी विनायक, हनुमानतळे आदी ठिकाणी जात होते. तसेच नागफणी, मुंबई पॉइंट, अभयारण्य, कोंढवळ धबधबा आदी ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटत होते. दर्शनासाठी वेळ लागत असल्याने अनेक भाविक मुखदर्शन, कळसदर्शन घेत होते. बसस्थानक ते मंदिर यादरम्यान फुले, फळे, बेल, आयुर्वेदिक औषधे, प्रसाद विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. वाहनतळ ते मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर, दत्तात्रय कौदरे, गोरक्ष कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, अंकुश कौदरे, जालिंदर कौदरे तसेच पावसामध्ये घोडेगाव व खेड पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, एसटी महामंडळाचे अधिकारी मारुती खळदकर यांनी वाहनतळापासून ते मंदिरापर्यंत भाविकांना लवकर दर्शन व्हावे, यासाठी प्रयत्न केले.

टोल नाक्यावर हवे नियोजन

भीमाशंकरला येत असताना वन विभागाच्या टोल नाक्यावर होणाऱ्या दिरंगाईमुळे वाहतूक कोंडीची परिस्थिती अधिकच बिकट झाली. टोलवसुलीसाठी गाड्या थांबवाव्या लागत असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रशासनाने गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलवसुलीबाबत योग्य नियोजन करण्याची किंवा गर्दीच्या वेळी टोल शिथिल करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT